यावेळी राज यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या वादावर फार थेटपणे भाष्य केले नाही. परंतु, राज्यातील जनता सध्याच्या राजकारणाला वैतागली आहे. अनेक लोकांनी दोन्ही दसरा मेळावे पाहिले नाहीत. याउलट मनसेबाबत लोकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. याचा फायदा घ्या. दिवाळीत घरोघरी जाऊन प्रचार करा. सकारात्मक आणि प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी. तसेच सत्ता आल्यावर मी तुम्हालाच पदावर बसवेन, मी कोणतेही पद घेणार नाही, अशी खोचक टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.
‘राज ठाकरे धावणार उद्धव ठाकरेंच्या मदतीला?’ व्हायरल होणाऱ्या Tweet वर काय म्हणतायेत शिवसैनिक
राज ठाकरे यांच्या आजच्या बैठकीनंतर मनसे महानगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने जोमाने कामाला लागण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्याच्या राजकारणाला जनता कंटाळल्याने आता त्यांच्यासमोर मनसे हा एकच पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला न भूतो न भविष्यती विजय मिळेल, असा आशावादही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
राज ठाकरेंची मनसैनिकांना तंबी
सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यावर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह याच्यावरुन जोरदार संघर्ष सुरु आहे. या वादात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. त्यानंतर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया देत शिवसेनेला लक्ष्य केले होते. यानंतर राज ठाकरे यांनी एक ट्विट केले होते. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.