Maharashtra Politics | सध्याच्या काळात टेलिव्हिजन, सोशल मीडिया यासारखी जनसंपर्काची प्रभावी माध्यमे असल्यामुळे ‘मशाल’ हे पक्षचिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणे फार अवघड नाही. पण धनुष्याबाणाप्रमाणे मशाल हे चिन्ह सामान्य मतदारांच्या मनात रुजवणे ही उद्धव ठाकरे यांची खरी परीक्षा आहे. भाजप आणि शिंदे गटाचे कडवे आव्हान समोर असताना ही कामगिरी कशी पार पाडायची, यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या इतिहासात डोकावणे गरजेचे आहे.

 

Shivsena Symbol
शिवसेनेचा धनुष्यबाण आणि मशाल

हायलाइट्स:

  • तरुणांमध्ये शिवसेना पक्षाची एक ‘क्रेझ’ तयार झाली होती
  • शिवसैनिकांना भावेल, अशा पद्धतीने मशाल या चिन्हाचा प्रचार करावा लागेल
मुंबई: शिवसेना पक्षाचा ट्रेडमार्क असलेले धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडे गोठवले. गेल्या ३३ वर्षांपासून राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना पक्षाची ओळख होते. सामान्य जनता आणि मतदारांच्या मनात हे चिन्ह इतके रुजले होते की, शिवसेना म्हटलं की आपसूकच धनुष्यबाण डोळ्यांसमोर यायचा. अगदी ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांनाही धनुष्यबाण (Bow and Arrow) म्हटलं की शिवसेना पक्षाला मतदान द्यायचे, हे सहजपणे कळायचे. मात्र, शिंदे गटाने पक्षावर आणि चिन्हावर उभा दावा सांगितल्याने शिवसेनेची ही ओळख क्षणार्धात हिरावली गेली आहे. चहुबाजूंनी राजकीय संकटांनी घेरला गेलेला शिवसेना पक्ष हा धनुष्यबाण गोठवला गेल्याने बिनचेहऱ्याचा झाला आहे. त्याऐवजी निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला धगधगती ‘मशाल’ ही निशाणी देऊ केली आहे. सध्याच्या काळात टेलिव्हिजन, सोशल मीडिया यासारखी जनसंपर्काची प्रभावी माध्यमे असल्यामुळे ‘मशाल’ हे पक्षचिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणे फार अवघड नाही. पण धनुष्याबाणाप्रमाणे मशाल हे चिन्ह सामान्य मतदारांच्या मनात रुजवणे ही उद्धव ठाकरे यांची खरी परीक्षा आहे. भाजप आणि शिंदे गटाचे कडवे आव्हान समोर असताना ही कामगिरी कशी पार पाडायची, यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या इतिहासात डोकावणे गरजेचे आहे.

१९८९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने धनुष्यबाण हे चिन्ह राज्यातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत आक्रमक प्रचार आणि अभिनव कल्पनांचा वापर केला. बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक नेतृत्त्व आणि प्रभावी वकृक्त्वशैलीचे शिवसेना पक्षाच्या विस्तारात निश्चितच मोठे योगदान आहे. परंतु, उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरून केलेली आंदोलने, निषेध करण्याची हटके पद्धत आणि खळखट्ट्याक शैली या सगळ्या गोष्टींमुळेही सामान्य मतदारांमध्ये विशेषत: तरुणांमध्ये शिवसेना पक्षाची एक ‘क्रेझ’ तयार झाली होती. याचाच वापर करून शिवसेनेने धनुष्यबाण हे चिन्ह वेगाने आणि प्रभावीपणे सामान्य मतदारांच्या मनावर बिंबवले. याची काही प्रातिनिधिक उदाहरणे द्यायची झाल्यास त्या काळात शिवसेनेकडून पुण्यातील संभाजी ब्रिज अर्थात लकडी पुलाच्या तोंडावर धनुष्यबाणाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. पुलापासून काही उंचीवर असलेला हा धनुष्यबाण पुलावरून ये-जा करणाऱ्या लोकांच्या सहज दृष्टीपथात होता. त्याकाळात प्रचाराची ही पद्धत निश्चितच प्रभावी ठरली. १९९९ साली मुंबईत झालेली शिवसेनेची सभादेखील पक्षचिन्हाचा प्रचार कसा करावा, याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. या सभेला शिवसैनिकांच्या सर्व रणरागिणींच्या हातामध्ये धनुष्यबाणाचे चिन्ह असलेले फलक देण्यात आले होते. त्यामुळे सभेचा संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता. अशा छोट्याछोट्या पण प्रभावी ठरणाऱ्या गोष्टींच्या माध्यमातून शिवसेनेने वेळोवेळी धनुष्यबाण हे चिन्ह मतदारांच्या मनात ठसवले.

Lakdi pool.

आता उद्धव ठाकरे यांना नेमक्या याच पद्धतीने म्हणजे सामान्य जनतेला आणि शिवसैनिकांना भावेल, अशा पद्धतीने मशाल या चिन्हाचा प्रचार करावा लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह बहाल केले. त्यानंतर काही तासांमध्येच शिवसेना स्टाईलमध्ये मशाल या निशाणीचा प्रचार सुरु झाला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी राज्यातील अनेक भागांमध्ये शिवसैनिकांनी मशाली घेऊन मोर्चे काढायाला सुरुवात केली आहे. उत्स्फुर्तपणा आणि आक्रमकपणा हा नेहमीच शिवसेनेचा स्थायीभाव राहिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात शिवसेना काहीशी मवाळ झाल्याचे बोलले जाते. मात्र, आता धगधगती मशाल राज्यभरात पोहोचवण्याच्या निमित्ताने संघटनेमध्ये पूर्वीची धग पुन्हा चेतवण्याची संधी उद्धव ठाकरे यांच्याकडे चालून आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात मशाल ही निशाणी आणि उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा नवा ब्रँड मतदारांपर्यंत कसा पोहोचणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here