ढाल तलवार आणि शिवसेनेचा इतिहास
शिवाजी पार्क या ऐतिहास मैदानात १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. मी आज माझा बाळ महाराष्ट्राला अर्पण करत आहे, असं प्रबोधनकार ठाकरे हे आपल्या भाषणात म्हणाले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना या संघटनेच्या झंझावाताला सुरुवात झाली. मराठी माणसांच्या न्याय-हक्कांसाठी लढणारी संघटना, एवढ्यापुरतंच शिवसेनेचं उद्दिष्ट सुरुवातीच्या काळात मर्यादित होतं. मात्र पुढच्याच वर्षी म्हणजे १९६७ मध्ये शिवसेनेनं ठाणे नगरपालिकेची निवडणूक लढवली. तसंच १९६८ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक मैदानातही बाळासाहेबांनी आपले उमेदवार उतरवले. या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिलेदारांचं चिन्ह होतं ढाल-तलवार.
शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि विधानसभेच्याही निवडणुका विविध चिन्हांवर लढवल्या. बाळासाहेबांच्या आक्रमक भाषणांनी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर होणाऱ्या उग्र आंदोलनांनी शिवसेनेची पाळंमुळं हळूहळू राज्यभर खोलवर रुजू लागली. याचाच परिपाक असा झाली की अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेला १९८९ मध्ये नोंदणीकृत पक्षाची मान्यता दिली. त्यानंतर शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्हही देण्यात आलं. तिथून पुढे प्रत्येक निवडणूक शिवसेनेचे उमदेवार धनुष्यबाण याच चिन्हावर निवडणुका लढवू लागले.
दरम्यान, मुंबईत झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना जे ढाल-तलवार चिन्ह मिळालं होतं, तेच चिन्ह आता आपल्या पक्षासाठी मिळवून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आपण एकरूप असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या चिन्हाचा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला आगामी काळात राजकीय यश मिळवण्यासाठी कसा फायदा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.