बिहारच्या पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील बगहामध्ये नरभक्षक वाघाला ठार करण्यात आलं. ८ ऑक्टोबरला वन विभागाच्या शूटर्सनी वाघाला ठार केलं. गेल्या ६ महिन्यांत वाघानं ९ जणांचा जीव घेतला. वाघाला ठार करण्यात आल्यानंतर एक मोठी घटना घडली. संतापलेल्या ग्रामस्थांनी वाघाच्या मृतदेहावर हल्ला केला.

वाघाला जंगलात सोडलं तरी तो काही दिवसांनी पुन्हा मानवी वस्त्यांजवळ येणार आणि हल्ले करणार अशी भीती ग्रामस्थांना वाटली. त्यामुळे ग्रामस्थ जमले. वन विभाग आणि स्थानिक पोलीस वाघाचं शव एका ट्रॅक्टर ट्रॉलीमधून नेत होते. ग्रामस्थांनी त्यांना रोखलं. आम्हाला वाघाचा मृतदेह दाखवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. बघता बघता ग्रामस्थ वाघाच्या मृतदेहाजवळ पोहोचले. त्यांनी अतिशय अमानुषपणे वाघाचे केस खेचले. काही ग्रामस्थ हातात काठ्या घेऊन वाघाला मारायला धावले.
जमावाला नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धक्काबुक्की केली. वाघाला आमच्या ताब्यात द्या, अशी गावकऱ्यांची मागणी होती. अखेर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर वाघाचा मृतदेह वन विभागाच्या कार्यालयात नेण्यात आला. पश्चिम चंपारण्य पोलिसांनी या प्रकरणी १ हजार जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. भारतीय दंड विधानाच्या १३ कलमांच्या अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.