पुणे : पुणे शहरातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याला पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. शेअर दलालाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्याच्या प्रकरणात गज्या मारणे याच्यासह १४ जणांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाईचे आदेश मंगळवारी दिले आहेत.

या प्रकरणी गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६), फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोवली, जि. सातारा), रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, पद्मावती), नवघणे यांच्यासह साथीदारांवर मकोका कारवाई करण्यात आली. अपहरणाचा हा प्रकार गेल्या आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी घडला होता.

ऋतुजा लटकेंचा राजीनामा अधांतरी, राजीनामा मंजूर न झाल्याने ठाकरेंसमोर अडचणींचा डोंगर?

नेमकं काय घडलं होतं?

३३ वर्षीय व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार यांची शेअर मार्केट व्यवहाराची कंपनी आहे. या कंपनीत हेमंत पाटील यांनी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तक्रारदार यांची कंपनी डबघाईला आल्याने परतावा देता आला नाही. पाटील याने वारंवार चार कोटींच्या बदल्यात २० कोटींची मागणी केली. थोड्या दिवसात चार कोटी रुपये देतो किंवा जमीन नावे करून देतो, असे तक्रारदाराने सांगितले.

हेमंत पाटील याने २० कोटींसाठी पप्पू घोलपला तक्रारदाराकडे पाठवले. हे पैसे तक्रारदार यांच्याकडून मिळवून देण्यासाठी गजा मारणे टोळी यामध्ये सहभागी झाली. त्यांनी शुक्रवारी दुपारी या व्यावसायिकाचे कात्रज परिसरातून अपहरण केले. त्याच्याकडे २० कोटींची खंडणी मागितली. खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व त्यांच्या पथकाला हा प्रकार समजला. पोलिसांनी शोध घेऊन शनिवारी दुपारी व्यावसायिकाची सुटका केली. त्याचवेळी आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here