सांगलीः सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेने नागरिकांसाठी संभाव्य महापुरासह अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्ती काळात उपयोगी पडणारे मोबाइल अॅप तयार केले आहे. ‘आपत्ती मित्र’ नावाच्या या अॅपचे सोमवारी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. राज्यात प्रथमच आशा प्रकारचे अॅप तयार केल्याचा दावा सांगली महापालिका प्रशासनाने केला आहे. (kolhapur flood)

गेल्यावर्षी आलेल्या महापुराने सांगलीत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. पाऊस आणि पुराची योग्य माहिती वेळीच नागरिकांना मिळाल्यास नुकसान टाळता येईल, या उद्देशाने सांगली महापालिकेने अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार आपत्ती मित्र हे अॅप तयार केले असून, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. या अॅपमध्ये संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सेवा, तसेच महापुराबाबत सर्व माहिती मिळणार आहे. चांदोली, अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीसह विसर्गाचीही माहिती अॅपमध्ये मिळणार आहे. महापूर काळात पाणी पातळी वाढत चालल्यास नागरिकांनी अॅपमध्ये पाणी पातळी सिलेक्ट केल्यास त्यांना त्या पातळीनुसार शहरात पाणी कुठे पोहोचेल याची नकाशासहित माहिती मिळेल. आपत्कालीन सेवा तसेच प्रशासनाच्या सूचना, महत्त्वाचे फोन नंबर, नियंत्रण कक्षाचे संपर्क नंबरसुद्धा यामध्ये समाविष्ट केले आहेत.

वाचाः

आपत्ती मित्र अॅपमुळे पूर पट्ट्यातील नागरिकांना पाऊस आणि पुराची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे नागरिकांना आपला बचाव करण्यासह साहित्याचे नुकसान टाळता येणार आहे. मागील महापुरामध्ये आलेल्या अनेक अडचणी आणि त्रुटींचा विचार करून मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि प्रशासनाने हे अॅप तयार केले आहे. हे अॅप महापूर किंवा अन्य आपत्ती काळात नागरिकांना वेळीच सावध करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला. आपत्ती काळात जनतेला महत्त्वाची माहिती देणारे अॅप विकसित करणारी सांगली महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका आहे. कोविडची माहिती देण्यासाठी याचा वापर सुरू असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.

वाचाः

अॅपसाठी सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते आणि त्यांच्या टीमकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. यावेळी महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी सभापती संदीप आवटी, गटनेते युवराज बावडेकर, आदी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here