मुंबई: ‘मुंबईतील करोनाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून इथे पुन्हा एकदा १०० टक्के लॉकडाऊन करण्याची गरज नाही,’ अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

तब्बल ७२ ते ७५ दिवसांच्या लॉकडाऊननंतर जूनच्या सुरुवातीपासून राज्य सरकारनं ‘अनलॉक’ला सुरुवात केली. टप्प्याटप्प्यानं व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकल, मेट्रो आणि एसटी सेवा वगळता इतर बहुतांश वाहतूक सेवांना काही प्रमाणात परवानगी देण्यात आली. सरकारी व खासगी कार्यालये, हॉटेल, सलून यांनाही काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनलॉकला सुरुवात झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याबरोबर रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. ठाणे, पुणे व रायगडमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली दिसत आहे. रायगड जिल्ह्यात रुग्णांची संख्या ८ हजारांवर गेली आहे.

वाचा:

त्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात व रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. तर, ठाण्यात लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत नेमका काय निर्णय घेतला जाणार याविषयी मुंबईकरांच्या मनात धाकधूक होती. मात्र, महापालिकेचे आयुक्त चहल यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. ‘मुंबईत पुन्हा एकदा १०० टक्के लॉकडाऊनची गरज नाही,’ असं त्यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

वाचा:

‘मुंबईतील करोनाची स्थिती पुणे आणि ठाण्यासारखी नाही. येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्यांच्या वर गेला आहे. तर, रुग्णांची संख्या दुपटीनं वाढण्याचा कालावधी ५० दिवसांपेक्षाही जास्त आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी सुधारणा होईल,’ असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला आहे.

वाचा:

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मुंबई हे करोनाचे हॉटस्पॉट आहे. येथील करोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. धारावी आणि वरळी हे मुंबईतले सुरुवातीचे सर्वाधिक बाधित भाग होते. या दोन्ही ठिकाणी पूर्ण लक्ष केंद्रित करून येथील संसर्ग जवळपास पूर्णपणे आटोक्यात आला आहे. धारावीतील करोना लढ्याचं तर जागतिक आरोग्य संघटनेनंही कौतुक केलं आहे. त्यामुळं महापालिका प्रशासनाचा आत्मविश्वास वाढला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here