Maharashtra Politics | मुंबई महानगरपालिकेकडून अद्याप हा राजीनामा मंजूरच करण्यात आलेला नाही. हा राजीनामा मंजूर झाल्याशिवाय ऋतुजा लटके यांनी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यास निवडणूक आयोगाकडून तो बाद ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे पालिकेने आज किंवा उद्याच्या दिवसात ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक दिवस उलटूनही लटके यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही

हायलाइट्स:
- ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरीतील के पूर्व कार्यालयात कर्मचारी आहेत
- पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांना नियमाप्रमाणे नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर व्हावा, यासाठी ठाकरे गटाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता न्यायालय ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला काही निर्देश देणार का, हे पाहावे लागेल.
नेमका वाद काय?
ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरीतील के पूर्व कार्यालयात कर्मचारी आहेत. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांना नियमाप्रमाणे नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. परंतु, अद्याप हा राजीनामा मंजूर झालेला नाही. शिंदे गटाच्या दबावतंत्रामुळे हा राजीनामा मंजूर होत नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी ऋजुता लटके यांचा राजीनामा मंजूर व्हावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न करत आहेत. सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात शिवसेनेचे काही पदाधिकारी ठाण मांडून बसले होते. महानगरपालिकेच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीला स्वेच्छानिवृत्ती हवी असेल तर तीन महिने आधी नोटीस द्यावी लागते आणि राजीनामा द्यायचा असेल तर एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. एक महिन्याची नोटीस नाही दिली, तर एक महिन्याचे मूळ वेतन जमा करावे लागते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी के पूर्व विभागातून ना हरकत मिळवली असून मूळ वेतनाची ६७ हजार ५९० रुपये ही रक्कम महानगरपालिकेच्या कोषागारात भरली आहे. परंतु, ऋजुता लटके यांचा राजीनामा मंजूर करायचा की नाही, याचा अंतिम निर्णय आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हातात आहे. ऋतुजा लटके यांनी ३ ऑक्टोबरला राजीनामा दिला असून एक महिन्याचा कालावधी पूर्ण न केल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरुन शिंदे गटाकडून इकबाल सिंह चहल यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.