अहमदनगर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातून १७ मतदार आहेत. यातील अवघा एक मतदार नगर शहरातील आहे. पक्षाचे नगर शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे नाव यादीत नसल्याने त्यांना मात्र मतदान करण्याचा अधिकार मिळणार नाही.

तब्बल २२ वर्षांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे व शशी थरूर निवडणूक रिंगणात आहेत. आता या निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. १७ रोजी मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालयात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात ५६५ प्रदेश प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार आहे. यात नगर जिल्ह्यातील १७ जणांचा समावेश आहे. या प्रतिनिधींनी १७ रोजी मुंबईत वेळेत हजर राहावे व येताना पक्षाने दिलेले प्रदेश प्रतिनिधी कार्ड व आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड ओळखपत्र समवेत आणण्याचे सांगण्यात आलं आहे.

ऋतुजा लटके यांची उमेदवारी रद्द झाली तर कोण? ठाकरेंच्या दोन शिलेदारांची नावं समोर

महाराष्ट्राच्या मतदार यादीतील ५६५ मतदारांमध्ये नगर शहरातील एक व नगर जिल्हा ग्रामीण भागातून १६ मतदार आहेत. नगर शहरातील एकमेव मतदार माजी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण आहेत. पक्षाचे विधीमंडळ गटनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे (संगमनेर) यांच्यासह प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा नाईक (अकोले), प्रतिनिधी करण ससाणे (श्रीरामपूर), विनायक देशमुख (नगर-प्रदेश सरचिटणीस), जयश्री बाळासाहेब थोरात (संगमनेर), हेमंत ओगले (श्रीगोंदे-प्रदेश सरचिटणीस), सचिन गुंजाळ (संगमनेर-प्रदेश सचिव), प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे (संगमनेर), कैलास शेवाळे (कर्जत- उपाध्यक्ष ग्रामीण), नगर ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके (कर्जत), राजेंद्र नागवडे (श्रीगोंदे), संपतराव म्हस्के (माजी अध्यक्ष, नगर तालुका), डॉ. एकनाथ गोंदकर (शिर्डी-उपाध्यक्ष ग्रामीण) व ज्ञानदेव वाफारे (पारनेर) असे १७ मतदार नगर ग्रामीणमधील आहेत.

दरम्यान, प्रदेश काँग्रेसकडून या सर्व मतदारांशी संपर्क साधण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here