ब्यावर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या एका विवाहितेनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. माझ्या १६ वर्षांच्या मुलीचा साखरपुडा वर्षभरापूर्वी नाहरपुरा येथे वास्तव्यास असलेल्या मुकेश सिंहशी झाला. काही दिवसांनंतर मुकेश लग्नाचा हट्ट करू लागला. मात्र आम्ही त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. फेब्रुवारीत मुकेश मुलीला स्वत:सोबत घेऊन गेला आणि तिला परत घेऊन आलाच नाही. याबद्दल विचारणा केली असता तो काही ना काही बहाणे सांगायचा. गेल्या ८ महिन्यांत त्यानं मुलीला भेटूही दिलेलं नाही, असं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.
लोकलाजेस्तोवर या प्रकरणी ८ महिन्यांत तक्रार दाखल केली नसल्याचं पीडितेच्या आईनं सांगितलं. आठ महिन्यांत मुलीसोबत दृष्कृत्य करण्यात आलं. तिचा शोध लागू नये यासाठी तिला वेगवेगळ्या जागी ठेवण्यात आलं, असंही महिलेनं तक्रारीत नमूद केलं आहे. अनेकदा प्रयत्न करूनही मुकेश आणि त्याच्या कुटुंबियांनी दाद दिली नाही. त्यामुळे आम्ही आमच्या नातेवाईकांसह नाहरपुरा येथे पोहोचलो. तिथे बराच वाद झाला. मात्र आम्ही आमच्या लेकीला घेऊन आलो. मुलीनं तिच्यासोबत झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. त्यानंतर आम्ही पोलीस तक्रार दाखल केल्याचं महिलेनं सांगितलं.