चित्रनगरीत कर्मचाऱ्यांना सापडलेल्या बछड्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कर्मचाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आले. हा बछडा उद्यानाच्या वन्यजीव रुग्णालयात उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आणि वन परिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांच्या देखरेखीखाली होता. त्यानंतर बछड्याची त्याच्या आईशी पुनर्भेट व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. १० ऑक्टोबर रोजी बछड्याला पिंजऱ्यात ठेवण्यात आले. त्यावेळी मादी बिबळ्या त्या पिंजऱ्याच्या आसपास फिरत होती; मात्र पिंजऱ्याजवळ जाणे तिने टाळल्याचे दिसले. ११ ऑक्टोबर रोजी हाच प्रयत्न पुन्हा करण्यात आला. त्यावेळी सभोवती कॅमेरा ट्रॅपही लावण्यात आले. १२ ऑक्टोबरच्या पहाटे ३.४५ वाजता बछड्याची आई पिंजऱ्याच्या ठिकाणी आली आणि त्यावेळी बचाव पथकामार्फत पिंजऱ्याचे दार दोरीच्या सहाय्याने सुरक्षित अंतरावरून उघडण्यात आले. बछडा बाहेर आल्यावर त्याच्या आईने त्याला जवळ घेतले आणि ती बछड्यासह जंगलात निघून गेली. ही संपूर्ण प्रक्रिया बारब्दे यांच्या नेतृत्वाखाली वैभव पाटील, संदीप गायकवाड, दिनेश गुप्ता, राजेश मेघवले, प्रशांत ठोकरे, अजय चुने, डॉ. पेठे आणि डॉ. जसना नांबियार, रेवती कुलकर्णी आणि संजय कांबळे यांनी पार पाडली. यामध्ये वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन आरे आणि वाइल्डलाइफ वेल्फेअर कॉन्झर्वेशन सोसायटीचे सदस्यांचीही मदत झाली.
वन खात्यासाठी आनंदवार्ता
ही मादी बिबळ्या सी ३३ असल्याचे समोर आले आहे. या मादीला गेल्या वर्षी रेडिओ कॉलर बसवण्यात आली होती. या मादीला पकडून नंतर तिला गेल्या वर्षी सोडून देण्यात आले होते. आता तिचे बछडे असल्याचे समोर आल्याने वन खात्यासाठीही ही आनंदाची बाब असल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून सांगण्यात आले आहे.