मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडकर हे गेली अनेक वर्षे इलेक्ट्रिक ठेकेदार म्हणून काम करायचे. मात्र, २०१८ पासून ते बांधकाम क्षेत्रात सक्रिय झाले होते. अनेक लहान मोठे प्रकल्प त्यांनी केले. मात्र, प्रकल्पासाठी पैसा अपुरा पडत असल्याने त्यांनी खाजगी सावकाराकडून व्याजावर पैसे घेतले होते. काही दिवसापासून त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावण्यात येत होता. ९ ऑक्टोबरला नांदेडकर यांनी काहीही न सांगता घर सोडले. तेव्हा ते त्यांचा मोबाईल देखील घरीच सोडून गेले.
मोबाईल चुकीने राहिला असेल म्हणून घरच्यांनी देखील लक्ष दिलं नाही. मात्र, ते रात्री घरी न आल्याने परिवार चिंतेत होता. अखेर त्यांच्या खोलीची पाहणी केली असता तेथे एक चिट्ठी घरच्यांना आढळून आली. त्या चिठ्ठीमध्ये सहा जणांची नावे आहेत, मात्र ती नावे कुणाची आहेत हे उघड होऊ शकले नाही. सुमारे १ कोटी रुपये कर्जाची परतफेड नांदेडकर यांनी सावकारांना केली होती. तरी देखील सावकाराचा त्रास देणं चालूच होतं, त्या जाचाला कंटाळून नांदेडकर यांनी घर सोडले.
सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल नसून सातारा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस नातेवाईक, मित्र परिवार, रेल्वेस्थानक, इत्यादी ठिकाणी नांदेडकर यांचा शोध घेत आहेत.