श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी केरळमधील एका दाम्पत्यानं दोन महिलांचा बळी दिल्याची घटना ताजी असताना आता गुजरातच्या सोमनाथ असाच काहीसा प्रकार घडला आहे. अंधश्रद्धेमुळे एका निष्पाप मुलीला जीव गमवावा लागला आहे.

भावेश अकबरीनं त्याची मुलगी धैर्याची काळ्या जादूनं आणि तंत्रमंत्रानं हत्या केल्याची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचं पथक धावा गावात पोहोचलं. भावेशनं आधी काळी जादू करून धैर्याला जमिनीत गाडलं आणि मग तिला बाहेर काढून जाळल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं.
धैर्याच्या अंगात भूत असल्याचा संशय भावेशला होता. सलग सात दिवस तिचा छळ केल्यानंतर त्यानं मुलीची हत्या केली, अशी माहिती गिर सोमनाथ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोहर सिंह जाडेजा यांनी दिली. धैर्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात भावेशचा भाऊ दिलीपनं त्याला मदत केली. दोघे धैर्याला घेऊन शेतात गेले. तिथे धैर्याचे जुने कपडे जाळले. दोन तास तिला आगीजवळ उभं केलं. त्यानंतर ऊसाच्या शेतात काठी आणि तारांनी तिला मारलं. तिच्या केसात एक दांडा बांधला आणि उपाशी ठेवलं. या त्रासामुळे मुलीनं जीव सोडला, असं जाडेजा यांनी सांगितलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.