मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या जागेवर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात जोरदार सामना बघायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली असून उद्या ऋतुजा या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांकडून एकत्रित उमेदवार दिला जाणार असून अद्याप उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. प्रमुख राजकीय पक्षांची अशी स्थिती असताना या पोटनिवडणुकीसाठी इतर ३ उमेदवारी अर्जही दाखल झाले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शुक्रवारी अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजपर्यंत तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. यामध्ये दोन अपक्ष उमेदवारांसह क्रांतीकारी जय हिंद सेना आणि हिंदुस्तान जनता पार्टी यांनी संयुक्तरीत्या एक उमेदवार दिला आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बहुरंगी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्रित खंजीर हे चिन्ह द्यायला हवं होतं; पडळकरांचा हल्लाबोल

कोणत्या उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केलं आहे.

कसा आहे निवडणूक कार्यक्रम?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १४ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. या अर्जांची छाननी १५ ऑक्टोबर रोजी होईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर असणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here