२०१७ मध्ये अर्चनाची भेट बालासोर जिल्ह्यातील ३३ वर्षांच्या जगबंधू चंदशी झाली. जगबंधू अतिशय महत्त्वाकांक्षी होता. तो गावात किराणा मालाचं दुकान चालवायचा. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. २०१८ मध्ये त्यांनी लग्न केलं. यानंतर जगबंधूनं वेगळाच उद्योग सुरू केला. तो अर्चनाच्या मदतीनं श्रीमंतांना हनिट्रॅप करायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा.
जगबंधू त्याच्या संभाव्य सावजांना स्वत:ची ओळख एका प्रमुख राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून करून द्यायचा. त्यामुळे श्रीमंत उद्योगपती, मंत्री, खासदार, चित्रपट निर्माते यांच्याशी त्याच्या ओळखी झाल्या. दोघे श्रीमंत व्यक्तींना आपल्या घरी बोलवायचे. त्यांना जेवणाचं निमंत्रण द्यायचे. चांगली ओळख झाल्यावर दोघे सावजाला जाळ्यात अडकवायचे. त्यांचे आक्षेपार्ह, अश्लिल व्हिडीओ तयार करायचे. त्यासाठी ते बेडरुममध्ये स्पाय कॅमेरे लावायचे. पुढे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पीडितांकडून पैसे उकळायचे.
अर्चनानं अनेकांना आपल्या जाळ्यात फसवलं. चित्रपट निर्माता अक्षय परीजियालादेखील तिनं गळाला लावण्याचा प्रयत्न केला. एका मुलीच्या माध्यमातून अर्चनानं अक्षयवर कास्टिंग काऊचचा आरोप केला. प्रकरण दाबण्यासाठी अर्चनानं ३ कोटी रुपयांची मागणी केली. मात्र अक्षयनं थेट नायापल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि अर्चनाचा पर्दाफाश झाला.