‘आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण याच सभागृहात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना करण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर लगेच त्यांच्याच अध्यक्षतेखाली शिवाजीपार्कवर मेळावा देखील पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वाटचालीत त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे आहे. कोणतेही काम हाती घेतलं की ते उत्तम व नेटकं करायचे ही छगन भुजबळ यांची खासियत आहे,’ अशा शब्दांत पवार यांनी भुजबळांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
‘भुजबळांमुळे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव’
शरद पवार पुढे म्हणाले की, छगन भुजबळ हे माझे ज्येष्ठ सहकारी असून त्यांची ६१ वी व आता अमृतमहोत्सला उपस्थित आहे. मी त्यांच्या कायम पाठिशी आहे. देशात सावित्रीबाई, महात्मा फुले यांचे विचार पुढे नेण्याचे काम भुजबळ करत आहे. मी ज्या पुणे विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठाला फुले यांचे नाव भुजबळांमुळे मिळाले याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष खा.डॉ.फारुख अब्दुल्ला, माजी राज्यसभा सदस्य आणि साहित्यिक डॉ.जावेद अख्तर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, गौरव समितीचे खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार कपिल पाटील, आमदार सचिन अहिर, राजेश टोपे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, डीएमकेचे आली शेख मिरान, माजी खासदार राजकुमार सैनी, मोतीलाल साखला, समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, ‘बहुजनांचा नायक छगन भुजबळ’ या पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान, विजय सामंत प्रकाशक अरविंद शाह यांच्यासह कुटुंबातील सदस्य व देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.