मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्याविरोधात भाजप उमेदवार देणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या बाळासाहेबांची शिवसेना या नव्या पक्षाचा शिलेदार मैदानात उतरवणार, याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र आता अखेर याबाबत शिंदे आणि भाजपचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात आज रात्री उशिरा झालेल्या बैठकीत या जागेचा तिढा सुटला असून शिंदे यांनी ही जागा भाजपसाठी सोडल्याचे समजते.

शिवसेनेतील फुटीनंतर होत असलेली पहिलीच मोठी निवडणूक म्हणून अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीसह राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजप आणि शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना दोन्ही बाजूकडून जपून पावलं टाकली जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं ऋतुजा लटके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर समोरून कोणता उमेदवार दिला जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज वेगवान हालचाली झाल्या. या जागेची उमेदवारी निश्चित करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत खलबतं केली. त्यानंतर अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपच्या चिन्हावर उमेदवार देण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं, असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

उद्धव ठाकरेंकडे फक्त बोट दाखवा, व्याजासकट नाही चक्रवाढ व्याजासकट हिशेब चुकता करते: सुषमा अंधारे

दरम्यान, या बैठकीबाबत अद्याप भाजप किंवा शिंदे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र शुक्रवारी सकाळी भाजप-शिंदे गटाचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

कोर्टात महापालिका तोंडघशी पडली अन् ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग झाला मोकळा

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने महापलिका प्रशासनावर ताशेरे ओढत त्यांचा राजीनामा मंजूर करण्याचा आदेश दिल्याने लटके यांच्या उमेदवारीच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत.

उमेदवारी निश्चित झाल्याने ऋतुजा लटके यांनी मुंबई महापलिकेच्या सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र मुंबई महापालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. या संदर्भात ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते अनिल परब आणि ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here