राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री पदाच्या मिळाल्यानंतर प्रथमच धुळे जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. या संदर्भात गिरीश महाजन यांना विचारणा केली असता त्यांनी यावेळी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “मला शिक्षक भरती विषयासंदर्भात जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असून कालपासून जवळपास ४०० ते ५०० फोन कॉल्स या विषयासंदर्भात आले आहेत. मला जाणीवपूर्वक कॉल करुन त्रास दिला जात असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
हा विषय माझा नसून हे सर्व काम शिक्षण विभाग बघत असतं ज्याचे मंत्री दीपक केसरकर आहेत. शिक्षक भरती संदर्भात कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली असून लवकरच शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होऊन शिक्षक भरती केली जाईल, असं गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ‘काम नाही का रे तुम्हाला काही सणासुदीच्या दिवसांत; दिवसभरातून ५०० फोन लावता. काही करत नाही मी, रद्द झाली ती परीक्षा. रद्द केली, फोन ठेव’, अशा शब्दांत जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या आरोग्य पदभरतीबाबब माहिती विचारणाऱ्या उमेदवाराला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिल्याची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लीपच्या सत्यतेबाबत अजून पुष्टी झालेली नाही. याबाबत अधिक माहितीसाठी महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच, “महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन” देखील या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.