Nanded Rain : नांदेड (Nanded) जिल्ह्यात परतीच्या पावसानं  (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळं झालं आहे. परतीच्या पावसानं कापसाच्या वाती झाल्या आहेत. तर सोयाबीनला कोंब फुटले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळं सोयाबीनसह कापूस, मूग आणि उडीद ही पिकं मातीमोल झाली आहेत.

परतीच्या पावसाचा पिकांना मोठा फटका

पावसाळ्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस, त्यानंतर अतिवृष्टी यामुळं दुबार-तिबार पेरणीनं आधीच शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यानंतर आता परतीच्या पावसाचा पिकांना फटका बसला आहे. आता कापणीस आणि काढणीस आलेले सोयाबीन, मूग, कापूस ही पिकं परतीच्या पावसानं मातीमोल झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगाव, उमरी, बिलोली ,अर्धापुर, भोकर, नायगाव, माहूर, किनवट,मुखेड, मुदखेड ,धर्माबाद व देगलूर या सर्व तालुक्यात परतीच्या पावसानं अक्षरशः कहर केला आहे. कारण गेल्या दहा दिवसापासून जिल्हाभरात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची सोयाबीन उडीद, मूग, कापूस ही हातची आलेली पिकं काढण्याची लगबग सुरु असताना पावसाच्या या उच्छादामुळं ही पिके होत्याची नव्हती झाली आहेत. तर सततच्या पावसाच्या रिपरिपीमुळं काढणीस आलेल्या कापसाच्या भिजून वाती झाल्या आहेत. 

अद्याप विमा कंपन्यांकडून पंचनामा नाही

सोयाबीनच्या पिकात गुढघाभर पाणी साचून सोयाबीनला कोंब फुटले आहेत. त्यामुळं हाती आलेली पिकं मातीमोल झाली आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी पीक विमा भरला तरी विमा कंपन्यांकडून अद्याप कोणताही पंचनामा झाला नाही. कृषी मंत्र्यांनी  शेतकऱ्यांचा पोळा गोड करु असे आश्वासन दिले होते. पण पोळा गेला, दसरा गेला आणि आता दिवाळी आली तरी सरकारकडून कोणतीही तत्काळ व ठोस मदत अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. त्यामुळं शेतकरी मात्र पुरता हवालदिल झाला आहे.

उद्यापासून राज्यात उघडीपीची शक्यता

सध्या राज्यात काही भागात परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या परतीच्या पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. मुंबईसह ठाण्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अन्य ठिकाणी मात्र, परतीच्या पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजपासूनच परतीचा मान्सून माघारी फिरणार आहे. त्यामुळं उद्यापासून (15 ऑक्टोबर) राज्यात उघडीपीची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र, सध्या मुंबईसह ठाणे परिसरात ढगाळ वातावरण असून, पावसाची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Monsoon : परतीच्या पावसाचा जोर कमी, उद्यापासून राज्यात उघडीपीची शक्यता 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here