अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम डाब भागातील कुकरखाडी पाडा येथे संशयित मोकन्या वसावे याच्या बहिणीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. पीडितेने जादूटोणा केल्यानेच बहिणीचा मृत्यू झाल्याचा संशय वसावेने घेतला. त्या संशयातून सोमवारी सायंकाळी पीडित महिलेला डाकीण ठरवून तिला घराबाहेर काढून हात दोरीने बांधण्यात आले. संशयिताच्या कुटुंबियांनी तिला बळजबरीने स्मशानभूमीत नेले. स्मशानभूमीला फेऱ्या मारायला लावून तिला शपथ दिली. यानंतर काठी आणि नॉयलॉनच्या दोरीने तिला चौघांकडून बेदम मारहाण करण्यात आली.
पीडितेची रात्री संशियतांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिडीतेने दहा किलोमीटर पायपीट करुन मोलगी ग्रामीण रुग्णालय गाठले. त्यांनतर पीडितेने या सर्व झालेल्या प्रकाराविषयी तक्रार दाखल करण्यासाठी बुधवारी मोलगी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. सार्व आपबिती पोलिसांना सांगितल्यानंतर मोलगी पोलीसांनी या प्रकरणी चौघांविरोधात मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेवून अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, अक्कलकुव्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर आणि मोलगी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक धनराज निळे यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी सुरु केली आहे.