मुंबई: महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांनी केला. खुद्द शिंदे यांनीही अशा प्रकारचा सूर आळवला. तर भाजप शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. आता मुंबईच्या अंधेरीत पोटनिवडणूक होत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपनंदेखील ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

शिवसेना तुमची म्हणता मग शिवसेनेच्या वाट्याला असलेली अंधेरी पूर्वेची जागा भाजपला का सोडली, असा सवाल ठाकरे गटाकडून शिंदे गटाला विचारला जात आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटानं दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहेत. शिंदे गटानं या ठिकाणी उमेदवार दिलेला नाही.
भाजप-शिंदे गटाला अतिआक्रमकपणा नडला; शिवसेनेची ‘मशाल’ अन् ऋतुजा लटकेंचा चेहरा चार दिवसांत घराघरात पोहोचला
आपण शिवसेनेवर दावा सांगतो. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला असणारी अंधेरी पूर्वेची जागा आपण लढवायला हवी, असा शिंदे गटातील आमदारांचा सूर होता. याबद्दल चर्चाही झाली. मात्र शिंदे गटानं उमेदवार दिला नाही. त्यामुळे भाजपनं उमेदवार दिला. मुरजी पटेल युतीचे उमेदवार असतील असं निश्चित झालं. त्यामुळे भाजप शिवसेनेला संपवत असल्याच्या ठाकरे गटाच्या आरोपांना बळ मिळालं.

शिंदेंनी अंधेरीची जागा सोडण्यामागे काही कारणं आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे स्थानिक समीकरणं. अंधेरी पूर्वेत शिंदेंकडे चांगला उमेदवार नाही. पती रमेश लटके यांच्या निधनानंतर निवडणूक लढवत असलेल्या ऋतुजा यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती आहे. त्यामुळे लटके यांना कडवी लढत द्यायची झाल्यास उमेदवार तुल्यबळ हवा. तो शिंदे गटाकडे नाही.
ऋतुजा लटकेंच्या शक्तिप्रदर्शनात खासदार कीर्तिकर पोहोचले; म्हणतात, तीन पक्षांचं सरकार…
ऋतुजा लटके मुंबई महापालिकेत नोकरीला होत्या. निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. मात्र तो स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे लटके मुंबई उच्च न्यायालयात गेल्या. त्यांच्या बाजूनं निकाल लागला. राजीनामा मंजूर केल्याचं पत्र लटके यांना द्या, असा आदेश न्यायालयानं दिला. त्यामुळे शिंदे गट बॅकफूटवर गेला. लटके यांच्या विरोधात निर्णय गेला असता तर शिंदे गटानं अंधेरीत उमेदवार देण्याचा विचार केला असता.

ऋतुजा लटके यांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी शिंदे गटानं प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. लटके यांनी शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची चर्चा झाली. पण तसं काही घडलं नाही. या मतदारसंघात भाजपकडे तुल्यबळ उमेदवार आहे. पटेल यांनी २०१९ मध्ये लटके यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. अपक्ष असूनही त्यांनी तब्बल ४५ हजारांहून अधिक मतं घेतली.
शिवसेनेच्या बड्या नेत्याला विजयाचा फुल्ल कॉन्फिडन्स; आत्ताच सांगितलं ऋतुजा लटकेंना किती मतं मिळणार?
२०१४ मध्ये शिवसेना, भाजपनं विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. तेव्हा युती तुटली होती. त्या निवडणुकीत भाजपनं सुनील यादव यांना उमेदवारी दिली होती. लटके यांच्यासमोर यादव ५ हजारांहून अधिक मतांनी पराभूत झाले. त्यांनी लटकेंना चांगली टक्कर दिली. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचं संघटन मजबूत आहे. त्यामुळेच शिंदे गटानं ही जागा भाजपला सोडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here