म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनसंदर्भात (ईआयए) सूचना आणि हरकती नोंदवण्याची अखेरची तारीख जवळ येत आहे, तशी इंटरनेटवर त्याची चर्चा वाढत आहे. ‘ईआयए’संदर्भात देशभरात हे मूल्यांकन बाजूला ठेवून प्रस्तावित प्रकल्पांबाबत माहिती आणि जनजागृती करण्याचे काम काही वेबसाइटच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामधील फ्रायडेज फॉर फ्युचर, लेट इंडिया ब्रीद, देअर इज नो अर्थ बी या वेबसाइट बंद झाल्या आहेत. ‘ईआयए’मधील प्रस्तावित बदलांना होणारा वाढता विरोध लक्षात घेता ही सेन्सॉरशिप लागू करण्यात आल्याची शंका या वर्तवण्यात येत आहे.

‘लेट इंडिया ब्रीद’ चळवळीचे सहनिर्माता यश मारवा यांनी ही वेबसाइट २९ जूनपासून बंद झाल्याचे सांगितले. ‘ईआयए’मधील प्रस्तावित बदलांचा भारतीय पर्यावरणावर विपरित परिणाम होणार आहे. यासाठी त्यांनी लेट इंडिया ब्रीद या वेबसाइटच्या माध्यमातून जनजागृतीचे काम हाती घेतले होते. या वेबसाइटच्या माध्यमातून अनेकांनी या प्रस्तावित बदलांसंदर्भात हरकती आणि सूचनांचे ई-मेलही पाठवले. मात्र, भारतीय सरकारच्या नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडियाकडून याचे कामकाज रोखण्याबाबत सूचना करण्यात आल्याचे त्यांना ‘गो डॅडी’ या वेबसाइटबाबत काम करणाऱ्या कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’लाही अशाच पद्धतीचा मेल पाठवण्यात आला आहे. यासंदर्भात १० जुलैला नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडियाशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र अद्यापही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे मारवा यांनी सांगितले.

दीड लाख हरकती व सूचना

‘ईआयए’संदर्भातील हरकती आणि सूचनांचे १ लाख ५० हजार ईमेल पाठवण्यात आल्याचा अंदाज मारवा यांनी व्यक्त केला. वेबसाइट बंद होण्याच्या आधी दोन दिवसांमध्ये सुमारे दोन लाख लोकांनी वेबसाइटला भेट दिली होती. त्यामुळे लोकांमध्ये होणाऱ्या जनजागृतीमुळेच ही वेबसाइट बंद करण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

ट्विटरवर विरोधी आवाज

फ्रायडेज फॉर फ्युचर आणि लेट इंडिया ब्रीद यांनी दोन्ही वेबसाइटच्या संदर्भात इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनने नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडियाशी संपर्क साधला आहे. मात्र त्यासंदर्भात अजून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या विरोधात पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सोमवारी संध्याकाळी ट्विटरवर इंटरनेट फ्रीडमसाठी आवाज उठवला. पर्यावरणासंदर्भात बोलणाऱ्यांवर बंदी कशासाठी असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here