म. टा. प्रतिनिधी, येरवडा

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवादविरोधी पथकाने (एटीस) ‘इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रोव्हिन्स’ (आयएस) या दहशतवादी संघटनेशी संबध असल्याचा संशयावरून अटक केलेल्या सादिया अन्वर शेख (वय २३, रा.येरवडा) हिच्या घरातून मोबाइल, लॅपटॉप, पुस्तके आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

विश्रांतवाडी येथील कळस भागातील दोन महिलांना ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याचा संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी सादियाला अटक करण्यात आली. एनआयए आणि पुणे एटीस यांनी संयुक्तपणे रविवारी सायंकाळी ही कारवाई केली. कारवाईबाबत यंत्रणांनी प्रचंड गोपनीयता बाळगली होती. सादियाला तिच्या फुलेनगर येथील घरी नेण्यात आले होते. त्या वेळी घराची झडती घेऊन मोबाइल, लॅपटॉप, पुस्तके आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर यंत्रणांनी नबील सिद्धिक खत्री (वय २७, रा. कोंढवा) याला कोंढव्यातून अटक केली. आरोपींकडे कसून चौकशी चालू असून, काही धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता यंत्रणांनी वर्तविली आहे.

सादिया शेख हिची आई साफिया शेख यांनी कळस भागात दोन वर्षांपूर्वी फ्लॅट खरेदी केला होता. एनआयए आणि पुणे एटीएस यांनी कळस भागात शेख यांच्या घरात छापा घातल्यानंतर फुलेनगरमधील जुन्या घरातून पुस्तके आणि वह्या जप्त करण्यात आल्या. शेख हिच्या विरोधात सबळ पुरावे मिळाल्यानंतर यंत्रणांनी तिला अटक केली, तसेच तिला कोंढव्यात नेले होते.

‘आयएस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणारे जहांजेब सामी (वय ३७), हीना बेग बशीर (वय ४०, रा. जम्मू काश्मीर) या पती-पत्नीला ८ मार्च २०२० रोजी दिल्लीच्या विशेष शाखेने अटक केली होती. अब्दुला बशीद (वय २७, रा. हैदरबाद) याला १७ मार्च रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. सध्या हे सर्व आरोपी तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहेत. आरोपी सादिया ही या तिन्ही आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय यंत्रणांना आहे.

दोन वर्षांपूर्वी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी सादिया शेख ही मानवी बॉम्ब बनण्याच्या तयारीत असल्याचा संशयावरून जम्मू-काश्मीर पोलिसांनी तिला अटक केली होती. आता पुन्हा दहशतवादी संघटनेच्या संर्पकात असल्याच्या संशयावरून तिला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

दिल्लीतील कोर्टात नेणार

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकांनी पुण्यातून अटक केलेल्या सादिया शेख आणि नबील खत्री या आरोपींना दिल्लीतील ‘एनआयए’च्या विशेष कोर्टात हजर केले जाणार आहे. दोन्ही आरोपी काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची योजना इतर साथीदारांसोबत आखत होते. ते ‘आयएस’ या या दहशतवादी संघटनेसाठी तरुणांची भरती करून भारतात केडर उभारण्याच्या प्रयत्नात होते. या आरोपींपैकी नबील खत्री पुण्यात व्यायामशाळा चालवतो, तर संबंधित तरुणी ‘मास कम्युनिकेशन्स अँड जर्नालिझम’च्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here