म. टा. प्रतिनिधी, ठाणे

कुख्यात गुंड विकास दुबे याच्या दोन साथीदारांचा ताबा ट्रान्झिट रिमांडच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी घेतला. या आरोपींना मंगळवारी विमानाने उत्तर प्रदेशला नेण्यात येणार असल्याची माहिती आरोपींचे वकील अनिल जाधव यांनी दिली. आरोपींची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

अरविंद उर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी आणि सुशीलकुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी या दोघांना दहशतवादविरोधी पथकाने ठाण्यातील कोलशेत भागातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांच्या पथकाने मुंबईत धाव घेत कानपूर प्रकरणात या आरोपींचा ताबा मागितला. आरोपींच्या ताबा देण्याविषयी आरोपींच्या वकिलाने न्यायालयात विरोध दर्शवला. मात्र हे प्रकरण कानपूर न्यायालयाशी संबंधित असल्याने ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती जाधव यांनी दिली. अशा प्रकारे पुढील चौकशीसाठी न्यायालयाने आरोपींचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना दिल्याचेही जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, ठाणे ते कानपूर हे अंतर जवळपास सुमारे १ हजार ४०० किमी इतके आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठी आहे. सध्या देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोपीला नेण्यासाठी आलेल्या पोलिस पथकामध्ये केवळ दोनच पोलिस आहेत. त्यामुळे रस्त्याने प्रवास शक्य नाही. करोनामुळे रेल्वे सेवाही ठप्प असल्याची बाब जाधव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. परिणामी आरोपींना विमानाने घेऊन जाण्याची मागणी करण्यात आली. सरकारी पक्षानेदेखील यावर युक्तिवाद केला. कानपूर न्यायालयात या आरोपींना १६ तारखेपर्यंत हजर करायचे असल्याने आरोपी विमानाने जाण्याबाबत निश्चित झाले आहे. मंगळवारी आरोपी विमानाने कानपूरला जातील, असेही जाधव म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here