Marathwada Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी (Farmers) संकटात सापडले आहेत. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या परतीच्या पावसानं मराठवाड्यातील सोयाबीन (Soyabean) आणि कापूस (cotton) पिकाला मोठा फटका बसला आहे. सोयाबीनचा बेल्ट असलेल्या मराठवाड्यात काढणीला आलेलं सोयाबीन शेतातच सडत आहे. परतीच्या पावसानं सोयाबीनचा चिखल केला आहे. लातूरसह, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

मराठवाड्यातील अनेक भागात सतत परतीचा पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर मागील पाच दिवस सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काढणीला आलेले सोयाबीन असेल किंवा फुलशेती आणि भाजीपाला शेती याला मोठा फटका बसला आहे. सोयाबीनच्या लागवडीपासून सोयाबीनच्या पाठीमागे काही ना काही संकट येत आहेत. गोगलगायीचा प्रादुर्भाव, विविध रोग आणि अतिवृष्टी अशा तिहेरी फटक्यातून सोयाबीन कसंतरी तगलं होतं. मात्र, परतीच्या पावसानं सोयाबीनचा अक्षरशः चिखल केला आहे.

हिंगोली जिल्ह्यात पावसामुळं पिकांचं नुकसान

परतीच्या पावसाने हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उभ्या असलेल्या सोयाबीनला मोड फुटले आहेत तर अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये तळ्याचे स्वरूप प्राप्त झाला आहे. दिवाळी सणाच्या पूर्वी सोयाबीन पीक काढणीला यावं आणि त्या सोयाबीनमधून मिळालेल्या पैशातून दिवाळी साजरी करावी, अशी शेतकऱ्यांची आर्थिक जुळवा जुळवा असते. परंतू या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सोयाबीन पाण्याखाली 

मागच्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. आष्टीपासून जवळ असलेल्या आष्टी पिंपरी या गावी अचानक झालेल्या पावसानं सगळी उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. एकनाथ भोसले यांचे तीन एकर सोयाबीन काढणीच्या अवस्थेत होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे सगळी सोयाबीनची शेती पाण्याखाली गेली आहे. खरंतर आष्टी तालुका हा आवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र, यावर्षी असा काही पाऊस बरसला की त्या पावसानं शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

मांजरा धरण 95 टक्के

लातूर जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब एकच ती म्हणजे मांजरा धरण हे 95 टक्के भरले आहे. मांजरा नदीवरील धरणाच्या पुढील 14 मोठे बॅरेजेस भरले आहेत. मांजरा धरणात पाण्याची आवक सुरुच राहिल्यास धरणाची दारं लवकरच उघडण्यात येतील. यामुळं या चौदा बॅरजेसचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. मांजरा नदीकाठावरील 152 गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. मांजरा धरण हे लातूर उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर आहे. उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळं मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rains: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा; सरकारचे स्पष्ट निर्देश 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here