औरंगाबाद : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे चांगलेच सक्रिय झाले आहेत. अमित ठाकरे हे सध्या राज्यव्यापी दौरा करत असून पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यात औरंगाबाद येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना अमित यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. पक्षाला गरज वाटली तर भविष्यात मी निवडणूक लढवू शकतो, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठवाडा दौरा सुरू असताना औरंगाबाद येथे पोहोचलेल्या अमित ठाकरे यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारत असताना पत्रकारांकडून अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही महाराष्ट्रभर फिरून नव्याने संघटन बांधण्यासाठी प्रयत्न करत आहात, भविष्यात निवडणूक लढवण्याबाबत तुमचा काय विचार आहे, असा प्रश्न अमित यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, पक्षाला जर गरज वाटली तर मी निवडणूकही लढवायला तयार आहे.

दरम्यान, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे ठाकरे कुटुंबातील पहिलेच व्यक्ती होते. आदित्य ठाकरे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत आदित्य यांनी मोठ्या मताधिक्याने विजयही मिळवला होता. त्यानंतर आता अमित ठाकरे यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

ठिय्या आंदोलन करणाऱ्या खडसेंना दणका; ३० वर्षांपासूनचे सुरक्षा कवच काढून घेतले

राज ठाकरे यांनी स्वत:ही केली होती विधानसभा लढवण्याची घोषणा

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राजकारणाचा वारसा असलेलं ठाकरे कुटुंब नेहमीच राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असते. या कुटुंबातील व्यक्ती प्रत्यक्ष निवडणूक मैदानात उतरण्यापेक्षा ‘रिमोट कंट्रोल’च्या राजकारणासाठी ओळखले जातात. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या सोमय्या मैदानावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात भाषण करताना आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र नंतर राज यांनी माघार घेतली होती.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? मटा ऑनलाईनच्या ट्विटर पोलचा निकाल

‘निवडणूक लढवण्याचा विचार मी केला होता. तशी घोषणाही मी केली होती. परंतु त्यानंतर बराच विचार केला. आम्हा ठाकरे कुटुंबाचा ‘जेनेटिकल प्रॉब्लेम’ आहे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणुका लढवल्या नाहीत. एका मतदारसंघापुरते मर्यादित राहिलो नाही. संपूर्ण महाराष्ट्र हाच आमचा मतदारसंघ मानला होता,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी तेव्हा निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय मागे घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here