सांगली: आरटीओ अधिकाऱ्याने लाच मागितल्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याने थेट मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील नायकाप्रमाणे कपडे काढून आरटीओ अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. कडेगाव येथे हा प्रकार घडला असून याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवी त्यांची कार पासिंग करण्यासाठी कडेगावमध्ये आयोजित आरटीओ कॅम्पमध्ये गेले होते. यावेळी एका अधिकाऱ्याने मांडवी यांच्याकडे लाच मागितली. कारची सर्व कागदपत्रे असताना लाच कशासाठी द्यायची, असा प्रश्न मांडवी यांना पडला. अधिकाऱ्याने लाच मागितल्याने मांडवी चांगलेच संतापले. त्यानंतर त्यांनी मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील एका दृश्याप्रमाणे स्वत:चे कपडे काढले आणि ते घेऊन लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याच्या मागे लागले.
VIDEO: ओ वाचवा! ड्रायव्हर किडनॅप करतोय! पुण्याच्या बसमध्ये प्रवाशाची आरडाओरड; नेमकं काय घडलं?
आरटीओ कार्यालयाच्या परिसरामध्ये मांडवी यांनी शर्ट, पँट उतरवली. तुम्हाला पैसे हवेत ना, हे घ्या पैसे. भिकारी आहे मी. हे कपडे घ्या तुम्ही, असे म्हणत मांडवी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याच्या मागे मागे गेले. मांडवींच्या गांधीगिरीमुळे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे धाबे दणाणले. मांडवी अधिकाऱ्याच्या मागे कपडे घेऊन जात असतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या सगळ्याची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here