eknath shinde raj thackeray, मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; भेटीचं कारणही आलं समोर – mns president raj thackeray reached varsha residence to meet chief minister eknath shinde
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या वर्षा निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे हे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. या भेटीचं कारण आता समोर आलं असून पुण्यातील मालमत्ता करासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचे समजते.
पुण्यातील मालमत्ता करासंदर्भातील तक्रारी घेऊन शहरातील काही लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या करामध्ये बदल करण्यात यावेत, अशी मागणीही राज यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली आणि त्यानुसार आज ते वर्षा या निवासस्थानी दाखल झाले असल्याची माहिती आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीची राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या या पहिल्या मोठ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबद्दल उत्सुकता आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूने चांगलीच ताकद लावली जात आहे. अशा स्थितीत मुंबईतील या मतदारसंघात राज ठाकरे यांची मनसे काय भूमिका घेणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेटीत या पोटनिवडणुकीविषयी काही चर्चा होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.