भाजप आणि शिवसेना यांची युती असताना झालेलं जागावाटप यापुढे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. शिंदे गट म्हणजेच शिवसेना असं भाजप नेते म्हणतात. मात्र त्यांच्या गटाला शिवसेनेइतक्या जागा दिल्या जाण्याची शक्यता अतिशय धूसर आहे. बऱ्याच ठिकाणी ‘अंधेरी पॅटर्न’ राबवला जाईल. आधीच्या जागावाटपात शिवसेनेकडे असलेल्या सर्वच जागा भाजप शिंदे गटाला देणार नाही. २०१९ मध्ये भाजपनं सेनेला १२४ जागा दिल्या होत्या. तर स्वत: १६४ जागा लढवल्या. पुढच्या निवडणुकीत शिंदेंना १२४ जागा मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
अंधेरीसारखी स्थिती राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये आहे. शिवसेनेचे १५ आमदार ठाकरेंसोबत आहेत. या जागांवर अंधेरी पॅटर्न पाहायला मिळू शकतो. तुमच्याकडे तगडा उमेदवार नाही, मग ही जागा आम्ही लढवतो, अशा स्वरुपाचा दावा भाजपकडून केला जाऊ शकतो. तसं झाल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप २०१९ पेक्षा अधिक जागा लढवेल.
विधानसभा निवडणुकीप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतही अंधेरी पॅटर्न पाहायला मिळू शकतो. त्याची तयारी भाजपनं आतापासूनच सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपच जिंकेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कालच व्यक्त केला. अरविंद सावंत या मतदारसंघाचे खासदार आहेत. ते अजूनही ठाकरेंसोबत आहेत. या ठिकाणी शिंदेंकडे उमेदवार नाही. त्यामुळे अंधेरीप्रमाणे ही जागा भाजप स्वत:कडे घेईल.
दक्षिण मुंबईप्रमाणेच राज्यातील एकूण १६ जागांवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. या जागा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आहेत. ठाकरेंसोबत असलेल्या खासदारांच्या मतदारसंघावर भाजपची नजर आहे. इतकंच काय शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघातही भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर येऊन गेले. तीन दिवस त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप अनेक ठिकाणी अंधेरी पॅटर्न राबवू शकतो.