कोहिनूर हिरा १०८ कॅरटचा आहे. १८४९ मध्ये महाराजा दलीप सिंह यांनी तो महाराणी व्हिक्टोरियांना दिला होता. १९३७ मध्ये महाराणींनी तो आपल्या मुकूटावर परिधान केला. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर भारतात कोहिनूर हिऱ्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. कोहिनूर हिरा भारतात परत आणला जावा अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली.
कोहिनूर हिऱ्याचा इतिहास काय?
एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे असलेल्या मुकूटाची निर्मिती १९३७ मध्ये झाली. सहाव्या जॉर्ज यांच्या राज्याभिषेकासाठी या मुकूटाची निर्मिती करण्यात आली. या मुकूटामध्ये अनेक मौल्यवान रत्नं आहेत. १८५६ मध्ये तुर्कस्तानच्या तत्कालीन सुलतानानं महाराणी व्हिक्टोरिया यांना भेट दिलेलं एक मौल्यवान रत्नही मुकूटामध्ये आहे.
जवळपास ८०० वर्षांपूर्वी भारतात एक चमकता दगड सापडला. त्याला कोहिनूर नाव देण्यात आलं. कोहिनूर हिरा जगातील सर्वात मौल्यवान हिऱ्यांपैकी एक आहे. कूह-ए-नूरचा अर्थ प्रकाशाचा पर्वत असा होता. गोलकुंड्यातील खाणीत कोहिनूर हिरा सापडला. पंजाबचे शेवटचे शीख शासक असलेल्या दलिप सिंह यांनी १८४९ मध्ये महाराणींना कोहिनूर हिरा भेट दिला होता.