बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर चंद्रपुर येथेही आपल्या अनुयायांना दीक्षा दिली. म्हणूनच बाबासाहेबांच्या परिवर्तन चळवळीच्या इतिहासात चंद्रपूरला एक महत्वाचे स्थान आहे. १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी त्यांचे वास्तव्य येथे होते. बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे ठरल्यानंतर बाबासाहेबांनी याकरता नागपूर शहराची निवड केली होती. बाबासाहेबांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आग्रहाच्या विनंतीमुळे त्यांनी १६ ऑक्टोबरला चंद्रपूरला येण्याचे मान्य केले होते. १६ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेब नागपूरच्या श्याम हॉटेल येथून सकाळी पाच वाजता निघाले. त्यांच्या सोबत माईसाहेब, त्यांचे भाऊ कबीर, सेवक नानकचंद रत्तू होते. हे सर्व खासगी मोटारीने चंद्रपूरच्या दिशेने निघाले. उमरेड, भिवापूर, नागभीड, मूल आणि चंद्रपूर असा हा प्रवास होता. मात्र, रस्ता कच्चा आणि खडतर असल्याने बाबाहेबांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता.

दीक्षाभूमी परिसरात उसळला होता लाखोंचा जनसमुदाय

बाबासाहेबांचे मूल येथे स्वागत करण्याकरता बॅरि. खोब्रागडे यांचे वडील देवाजी भिवाजी खोब्रागडे आणि जनार्दन संत गुरुजी हे अगोदरच येथे पोहोचले होते. बाबासाहेबांची येथील शासकीय विश्रामगृहात व्यवस्था केली होती. बाबासोहब जेव्हा इथे आले तेव्हा प्रवासादरम्यान ते फार थकलेले होते. यानंतर काही वेळाकरता विश्रांती घेतल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास बाबासाहेबांनी चंद्रपूरकडे प्रस्थान केले. यवतमाळ, वणी, वर्धा तसेच आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील बाबासाहेबांना मानणारा समाज लाखोंच्या संख्येने जमला होता.

बाबासाहेबांना मानवंदना

हातात दोन दिवसांची शिदोरी घेऊन आपल्या कुटुंबासह शेकडो मैलांचा प्रवास करत येथे नागरिक पोहोचले होते. दीक्षाभूमी परिसरात सोहळ्याकरता भव्य दोन मजली मंच सुसज्ज होता. व्यासपीठावर उंच टेबलावर भगवान बुद्धाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. देवाजी भिवाजी खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत समिती तयार करण्यात आली. बाबासाहेबांना सलामी देण्याकरता सर्व चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाबासाहेबांचे सर्किट हाउस येथे आगमन होताच त्यांना समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

त्रिशरण, पंचशील आणि धम्मदीक्षा…

थोडा वेळ आराम केल्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांनी दीक्षाभूमीकडे प्रस्थान केले. त्यांनी सर्वांना हात जोडण्यास सांगितले. त्यांनी उपस्थितांना त्रिशरण, पंचशील आणि धम्मदीक्षा दिली. नंतर बाबासाहेबांनी सांगितलेल्या २२ प्रतिज्ञा वाचण्यात आल्या. यानंतर बाबासाहेब खुर्चीवर बसले. त्यांनी जनसमुदायाला संबोधित करावे, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, बाबासाहेबांची प्रकृती बरी नव्हती. पाठीच्या मणक्याच्या दुखण्यामुळे त्यांना कमालीच्या वेदना होत होत्या. मधुमेहाचा त्रासही वाढला होता. त्यांना विश्रांतीची गरज होती. बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. ते सर्किट हाउसमध्ये गेले.

बाबासाहेबांनी दिलेला संदेश

१७ ऑक्टोबरला सकाळी सर्किट हाउस येथे बाबासाहेबांना बघण्याकरता गर्दी उसळली होती. आजच ते नागपूरहून दिल्लीला जाणार होते. बाबासाहेबांनी आपल्या मार्गदर्शन करावे अशी सर्वांची उत्कट इच्छा होती. वऱ्हांड्यात खुर्चीवर बाबासाहेब बसलेले होते आणि त्यांनी उपस्थितांना संदेश दिला. ते म्हणाले, ‘तुमच्याकरता मी जे करू शकत होतो ते मी करून ठेवले आहे. आता पूर्वीचे जगणे सोडून द्या. आपल्या मुलामुलींना खूप शिकवा. नवरा जर दारू पित असेल तर त्याला घरात पाऊल ठेवू देऊ नका. आपल्या दरिद्रीपणाचे प्रदर्शन करू नका. नीटनेटके आणि स्वच्छ रहा. आपले फाटके कपडे असल्यास ते विहिरीवर न धुता नदी, नाल्यावर धुवा. असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

दीक्षाभूमीवर लाखोंचा जनसागर

ते पुढे म्हणाले, ‘आता तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. याचे सक्तीने पालन करा. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ मी तयार केला आहे. हा ग्रंथ कुठल्याही धर्मग्रंथाच्या तोडीचा आहे. त्यामुळे याचे नियमित वाचन करा. गाववस्तीत बौद्ध विहार तयार करून त्यात दर रविवारी एकत्र या, असे आवाहन बाबासाहेबांनी जनसमुदायाला केले. अस्पृश्य समाजाकरता आपले सर्व आयुष्य वेचणाऱ्या त्यांच्या दोन दिवसाच्या वास्तव्याने चंद्रपुर नगरी पावन झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत १५ आणि १६ ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर लाखोंचा जनसागर उसळतो. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणून तो साजरा केला जातो.

पुस्तकातूनच भेटतात बाबासाहेब…

चंद्रपूर येथे बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. बाबासाहेबांचा परिवर्तन चळवळीच्या इतिहासाला चंद्रपूरला एक महत्वाचे स्थान आहे. १६ ऑक्टोबरला लाखोंचा संख्येने आंबेडकरी अनुयायी चंद्रपुरच्या दीक्षाभूमीला भेट देतात. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात करोडो रुपयांच्या पुस्तकांची विक्री होत असते. पुस्तके घेण्यासाठी बुक स्टॉलवर पुस्तक प्रेमींची गर्दी बघायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here