मुंबई: करोनामुळे दलाला मोठा हादरा बसला आहे. गेल्या ७२ तासांत पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे दगावलेल्या पोलिसांची संख्या ८१ झाली आहे.

गेल्या ७२ तासांत मुंबई, नवी आणि पालघर येथील चार पोलिसांचा करोनाने मृत्यू झाला आहे. वालिव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई जितेंद्र भालेराव (३८) आणि नवी मुंबई पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अविनाश दादेकर (४७) यांचा सोमवारी तर वाहतूक खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव (५५) यांचा रविवारी मृत्यू झाला. स्पेशल ब्रँच-१ चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल रणपिसे (५७) यांचा रविवारी मुंबईत मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईतच आतापर्यंत ४८ पोलिसांचा मृत्यू झाला असून राज्यात ८१ पोलीस दगावले आहेत.

कॉन्स्टेबल किरण साळुंखे (४०) यांचा ९ जून रोजी पालघरमध्ये मृत्यू झाला होता. साळुंखे हे मुरबाडचे रहिवासी आहेत. त्यांना नालासोपारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पालघरमध्ये सुमारे ३० करोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत १३० पोलीस करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

कोस्टल सेक्युरिटी ब्रँचचे कॉन्स्टेबल दादेकर यांचा सोमावारी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे १८ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नवी मुंबईत आतापर्यंत १८३ पोलिसांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी ५२ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांच्या कुटुंबातील १०१ जणांवर उपचार करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस अधिकारी संजय कुमार यांनी ट्विट करून सांगितलं.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल रणपिसे यांच्यावर मालाडच्या लाइफ लाइन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी एप्रिलमध्ये विशेष रजा घेतली होती. रणपिसे हे करोनाबाधिताच्या संपर्कात कसे आले हे माहीत नाही. त्यांना हृदयाची समस्या होती. श्वास घ्यायला त्रास होत असल्याची गेल्या महिन्यात त्यांनी तक्रारही केली होती. त्यांना सर्दी-खोकला होता. पण ताप नव्हता. त्यांना ३ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७ जुलै रोजी त्यांचा रिपोर्ट आला असता त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

मुंबईच्या अँटि नार्कोटिक्स सेलचे कॉन्स्टेबल मंगेश कांबळे (४७) आणि वरळी वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल शैलेश नाईक (५० ) यांचा करोनाने २९ जून रोजी मृत्यू झाला. या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. कांबळे वरळीच्या बीडीडी चाळीत राहतात. २९ जून रोजी कामावर जाण्याची तयारी करत असताना अचानक ते कोसळले. त्यानंतर त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच तासाभरात त्यांची प्राणज्योत मालवली. तर नाईक हे मेपासून सुट्टीवर होते. त्यांना आधी हिरानंदानी आणि नंतर कोहिनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरातच क्वॉरंटाइन करण्यात आले होते. पण काही दिवसाने त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोहिनूरमध्ये दाखल केलं असता त्यांचा मृत्यू झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here