ज्योतिरादित्य शिंदे यांचा जय विलास पॅलेस हा ग्वालिअरची शान असल्याचं बोललं जातं. ४ हजार कोटी किंमत असलेल्या हा भव्य-दिव्य राजमहाल पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरतो. या राजमहालाच्या भव्य-दिव्यतेचे किस्से ऐकल्यानंतर लोकांनाही इथे जाण्याचा मोह आवरता येत नाही. या महालात शिंदे राज परिवारातील सदस्य अजूनही राहतात त्यामुळं सामान्य नागरिकांना आत जाण्याची परवानगी नाहीये. मात्र, काही खास पाहुण्यांना मात्र राजमहालाचा पाहुणचार अनुभवायला मिळतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जयविलास पॅलेसमध्ये डिनर पार्टी आयोजित करण्यात आली आहे. अमित शहा आज पहिल्यांदाच जय विलास पॅलेसमध्ये जाणार आहेत. आज या राजमहालाबाबत जाणून घेऊया आश्चर्यकारक गोष्टी

जयाजीराव शिंदे यांनी बांधला होता महाल

शिंदे घराण्याने या राजमहालाचे बांधकाम केले आहे. १८७४ साली जयाजीराव शिंदे यांनी हा महाल बांधला. जयाजीराव शिंदे या ग्वालीअरचे महाराजा होते. जयविलास पॅलेसचे बांधकाम १२४०७७१ स्केअर फूटमध्ये करण्यात आले आहे. वास्तुविशारद सर मायकल फिलोज यांनी काम केले आहे. महाल बांधण्यासाठी टस्कन शैलीसह कोरिंथियान आणि इटालीयन शैलींचा प्रयोग केला गेला आहे. १८७४मध्ये जेव्हा वास्तूचे बांधकाम करण्यात आले तेव्हा त्याचा खर्च १ कोटी रुपये आला होता. आज या महालाची किंमत ४ हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे.

जेवण वाढायला चांदीची ट्रेन

जय विलास पॅलेसची खासियत म्हणजे जेवणाच्या टेबलवर असलेली चांदीची ट्रेन. खास पाहुण्यांसाठी या चांदीच्या ट्रेनमधून जेवण वाढलं जातं. ट्रेन धावण्यासाठी टेबलवर रुळदेखील बनवण्यात आले आहेत. ही चांदीची ट्रेन महालाची शान अधिक वाढवते.

४०० खोल्यांचा शाहीथाट

राज महालात ४०० खोल्या आहेत. त्यातील काही खोल्या सामान्य नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहे. महालाच्या आतच संग्रहालय बनवण्यात आलं आहे. तिथे सामन्य नागरिकांना जाण्याची परवानगी आहे. मात्र, आतील भागात कोणालाही जाण्याची परवानगी नाही. महालाच्या इतर खोल्या या राजपरिवारातील सदस्यांसाठी आहेत.

तीन हजार किलोंचे झुंबर

या महालात जगातील सगळ्यात मोठे झुंबर लावण्यात आले आहे. हे झुंबर ३५०० किलोंचे असून १४० वर्षांपासून ते महालाच्या छताला टांगले आहे. काही तज्ज्ञांच्या मते हे झुंबर लटकवण्याच्या आधी छत किती मजबूत आहे हे तपासण्यात आले होते. बेल्जिअमच्या कामगारांकडून हे झुंबर तयार करण्यात आले आहे. राजमहालात इतक्या किलो वजनाचे झुंबर लावण्याआधी छतावर हत्ती चढवण्यात आले होते. जेणेकरून महालाच्या मजबूतीचा अंदाज येईल. या शाही झुंबराची खूप चर्चाही झाली होती.

किंग एडवर्ड यांचा भारत दौरा

हा महाल बांधण्यामागे एक उद्देश होता. तो म्हणजे वेल्सचे राजकुमार किंग एडवर्ड यांचा भारत दौरा. किंग एडवर्ड यांचे भव्य स्वागत करण्यासाठी या अलिशान महालाचे निर्माण करण्यात आले. ४०० खोल्या असलेल्या या महालातील ३५ खोल्यांमध्ये संग्रहालय करण्यात आलं आहे. १९६४मध्ये या ३५ खोल्या सर्वसामान्य जनतेसाठी खुल्या करण्यात आल्या.

शाही बग्गी

जय विलास पॅलेसच्या ट्रस्टी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पत्नी प्रियदर्शनीराजे शिंदे या आहेत. महालाच्या आत अजूनही प्राचीन वस्तू जपून ठेवल्या आहेत. खासकरून छताच्या सिलिंगवर जडवलेले सोनं आणि हिरे आणि शाही बग्गी अजूनही महालाची सुंदरता वाढवतात. त्याचबरोबर महालाच्या आत अनेक ठिकाणी सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. त्याचबरोबर शिंदे घराण्याच्या पूर्वजांचे फोटोही पाहायला मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here