देवेंद्र फडणवीस म्हणाले…
भाजपमध्ये मी एकटा निर्णय घेत नाही, त्यामुळे मला पक्षातील नेत्यांशी चर्चा करावी लागेल. त्यांच्या पत्रावर विचार जरी करायचा झाला तरी मला पक्षातील नेत्यांशी तसेच वरिष्ठांशी बोलावे लागेल, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार मागे घेण्यावर कुठलंही भाष्य केलेलं नाही तसेच राज ठाकरे यांना आश्वस्तही केलं नाही.
आम्ही याआधी विधान परिषदेच्या २ जागांसंदर्भात उमेदवार न देण्याची भूमिका घेतली होती. आर आर पाटलांच्यावेळीही आम्ही उमेदवार न देण्यासंबंधी भूमिका घेतली होती. असं नाहीये की आम्ही याआधी कधी भूमिका घेतली नव्हती. पण आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करावी लागेल. त्यामुळे ही सगळी चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या पत्रावर सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त करेन, असं फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
प्रिय मित्र देवेंद्र…
एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.
मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.