गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाचे केंद्र झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दिवसागणिक नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वीच भाजप आणि ठाकरे गटाकडून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. त्यामुळे ही लढत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल अशी दुरंगी होणार, हे स्पष्ट झाले होते. परंतु, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri By-Election) नवा ट्विस्ट आला आहे. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके बिनविरोध निवडून जाणे, हे महाराष्ट्राच्या परंपरेला आणि संकेताला धरून आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या याच टायमिंगवर उलट सुलट चर्चा सुरु आहे. ‘हरहर महादेव’ या चित्रपटाला राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे. अभिनेते सुबोध भावे यांनी राज ठाकरे यांची खास मुलाखत घेतली. ही मुलाखत संपल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या संवादात राज यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
राज ठाकरे म्हणाले, “रमेश लटके यांच्यासारखा चांगला काम करणारा कार्यकर्ता आपल्यातून गेला. अशा परिस्थितीत त्यांची पत्नी जर तिथे निवडणुकीसाठी उभ्या राहत असतील, तर बिनविरोध निवडणूक कशी होईल, याचा विचार व्हायला हवा, हे लक्षात घेऊन मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. साधारण दोन वर्षच विधानसभा निवडणुकीला राहिलेले आहेत. मग अशा परिस्थितीत कशाला उमेदवार द्यायचा. त्यापेक्षा ही निवडणूक बिनविरोध करुन राज्याची संस्कृती सगळ्यांना दाखविण्याची संधी आहे”
“भारतीय जनता पक्ष हा वेगळा पक्ष आहे. तो पक्ष मी चालवत नाही. मी फक्त त्यांना विनंती करु शकतो. राहिला प्रश्न, त्यावेळी भूमिका का घेतली नाही, आणि आता का घेतली… तर माझे आणि रमेश लटके यांचे जवळचे संबंध होते. रमेश खूप चांगलं काम करणारे कार्यकर्ते होते. हे लक्षात घेऊन मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. शेवटी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधली संस्कृती वेगळी आहे. आणि हीच वेगळी संस्कृती दाखविण्याची आपल्याला संधी आहे, त्याच अनुषंगाने मी फडणवीसांना पत्र लिहिलं”, असं राज ठाकरे म्हणाले.