Gram Panchayat Election voting, राज्यातील सत्तांतरानंतरची महत्त्वाची निवडणूक; १०७९ ग्रामपंचायतींसाठी किती टक्के झालं मतदान? – 74 percent polling for 1079 gram panchayats in 18 districts
मुंबई : राज्यातील विविध १८ जिल्ह्यांमधील १ हजार ७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी ताकद लावली होती. या निवडणुकीत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान पार पडले.
राज्य निवडणूक आयोगाने १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात १ हजार ७९ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळत मतदान झाले. दुपारी ३.३० पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी ६४.८३ टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलग्रस्तभागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी उद्या (१७ ऑक्टोबर) मतमोजणी होईल. देगलूर, पंढरपूरला का भूमिका घेतली नाही, अंधेरीतच का? राज ठाकरे म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टीत…’
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:
ठाणे- १३४, पालघर- ३३६, रायगड- १६, रत्नागिरी- ३६, सिंधुदुर्ग- ४, नाशिक- १८७, नंदुरबार- २००, पुणे- १, सातारा- ४, कोल्हापूर-३, अमरावती-१, वाशीम-१, नागपूर- १५, वर्धा-९, चंद्रपूर- ९२, भंडारा-१९, गोंदिया-५ आणि गडचिरोली-१६. एकूण-१०७९.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. मात्र विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह स्थानिक नेते या निवडणुकीसाठी आपले राजकीय कसब पणाला लावतात. कारण या निवडणुकांमध्ये मिळालेली ताकद पुढे तालुका पातळीवरील निवडणुकीसाठी उपयुक्त ठरते. त्यातच राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या उलथापालथीमुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकींना आक्रमकपणे सामोरे गेले होते.