राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर ठाकरे गटावर नाराज असलेल्या अनेक संघटना या शिवसेनेच्या ठाकरे गटातून बाहेर पडल्या आहेत. गेल्या १५ वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवशक्ती-भीमशक्तीचे काम करत असलेला युनायटेड रिपब्लिक पक्ष देखील आता ठाकरे गटावर नाराजी व्यक्त करत बाहेर पडला आहे.
उद्धव ठाकरेंवर केला थेट आरोप
उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी आपला विश्वासघात केल्याचा आरोप देखील यावेळी या पक्षाकडून करण्यात आला आहे. गेल्या १५ वर्षांपासून आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती प्रयोग राबवत असल्याचे यावेळी ननावरे यांनी सांगितले. नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी या पक्षाकडून करण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केलं पण नाव दिलं नाही. तसेच ७ मे २०२१ रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर काढण्यात आला. हा काळा कायदा रद्द करण्याची मागणी देखील या पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी तोंडाला पान पुसण्याचे काम केलं असल्याचा आरोप यावेळी युनायटेड रिपब्लिक पक्षाचे नेते तानसेन ननावरे यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर युनायटेड रिपब्लिक पक्षाने आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपला पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिवशक्ती भिमशक्तीची संकल्पना मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे या पक्षाकडून सांगण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवशक्ती- भीमशक्तीची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभी करून राज्यव्यापी शिवशक्ती-भीमशक्ती संकल्प अभियान सुरू करत असल्याचे आश्वासन यावेळी युनायटेड रिपब्लिक पक्षाचे नेते ननावरे यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन अनेक संघटना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युतीच्या सरकारला पाठिंबा दर्शवत आहे. तसेच अनेक नेते पदाधिकारी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत इन्कमिंग सुरूच असल्याचं बोलले जात आहे.