गुरसाळे येथे पार पडेलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजन प्रसंगी ते बोलत होते. पाटील यांच्या या वक्तव्यानंतर काय झाडी, काय डोंगर या संवादामुळे राज्यात चर्चेत आलेल्या आमदार शहाजी पाटील यांनी विधानसभा निवडणूक रणांगणातून काढता पाय घेतला की काय ?, अशी टीका विरोधकांकडून केली जाऊ लागली आहे.
पाटील पुढे म्हणाले की, ‘अभिजीत पाटील यांच्यासाठी पंढरपूरमधून परिचारक, मंगळवेढ्यातून अवताडे तर माढयामधून बबनदादा म्हणतंय माझं पोरग भाजप मध्ये पाठवतो. आपलं झाडी डोंगर अस झालंय की आपल्या काय नांदेडमध्ये गेलं की गर्दी, कोकणात गेलं तरी गर्दी. त्यामुळे मला तुमच्यासारखं विधानपरिषदे वर घ्या आणि अभिजितला सांगोल्यात उमेदवारी द्या’. आमदार पाटील यांनी अशी मागणी भरसभेत केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘काय झाडी, काय डोंगार’फेम बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी आपल्याला चक्क विधानपरिषदेवर पाठविण्याची मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे. आमदार पाटील यांच्या मागणीनंतर शिंदे गटात व सांगोला मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.
सांगोल्याचे शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्याकडून सतत पराभव स्वीकारणारे शहाजी पाटील हे सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करुन अवघ्या काही मतांच्या फरकाने सांगोल्यातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत. पुढच्या निवडणुकीत शेकापचे आव्हान मोठे राहणार याची जाणीव झाल्यानेच आमदार शहाजी पाटील यांनी आता विधानसभेऐवजी विधान परिषदेवर पाठवण्याची विनंती भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे काय अशी चर्चा मतदार संघात सुरु झाली आहे.