bjp meeting, भाजपच्या गोटात वेगवान हालचाली: रात्री उशिरा हाय व्होल्टेज बैठक: अंधेरी पूर्वतील उमेदवारी मागे घेणार? – high voltage meeting of bjp leaders andheri murji patel east candidature likely to be withdrawn
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तसंच भाजप यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेली असतानाच आता या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजप उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेत तशीच भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर कोंडीत सापडलेल्या भाजप नेत्यांची काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते. पोटनिवडणुकीत दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील उमेदवार मैदानात असेल तर सहानुभूतीची लाट असते. त्यातच राज ठाकरे आणि शरद पवार यांनीही भाजपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनावर भाजप नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. मात्र या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपकडून यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. बिनविरोधाची मागणी मिलीभगत, ठाकरे गटाच्या आरोपावर राज म्हणाले, घ्यायचं तर घ्या, नाहीतर…
दरम्यान, अंधेरी पूर्वच्या जागेसाठी छाननीअंती १४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आज, १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा की नाही, याबाबत आज दुपारपर्यंत भाजपकडून निर्णय घेतला जाणार आहे.
अंधेरी पूर्वच्या रणांगणात वैध ठरलेले उमेदवार कोणते?