गेल्या आठवड्यात अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम आज आशियाई शेअर बाजारावर दिसून येत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार लाल चिन्हात उघडले. अमेरिकन बाजारातील महागाई आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ होण्याची भीती अधिक गडद होताना दिसली.
बाजाराची सुरुवात
आज बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स १६७.४७ अंकांनी किंवा ०.२९ टक्क्यांनी घसरून ५७,७५२.५० वर उघडला. दुसरीकडे, एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ४०.९० अंकांच्या किंवा ०.२४ टक्क्यांच्या घसरणीसह १७,१४४ वर उघडला.
जागतिक बाजारातून कमकुवत सिग्नल
दुसरीकडे, जागतिक बाजारातून कमजोर संकेत मिळत होते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकन बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. महागाई आणि फेडरल रिझव्र्हच्या व्याजदर वाढीची भीती दाटलेली दिसत होती. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी अमेरिकन बाजार ३ टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह बंद झाला. डाऊ जोन्स ४०४ अंकांनी घसरून २९६३५ वर तर Nasdaq ३२७ अंकांनी घसरून १०३२१ अंकांवर बंद झाला. S&P 500 २.३७ टक्क्यांनी घसरले.
एका अहवालात असे दिसून आले की अमेरिकेतील ग्राहकांना महागाई उच्च राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे फेडला व्याजदरांबद्दल आपली आक्रमक भूमिका पुढे चालू ठेवावी लागेल असे बाजाराला आणखी एक संकेत दिला आहे. फेड रिझर्व्हची आक्रमक भूमिका मंदीचा धोका वाढवते.
कोणते शेअर्स पडले
जेएसडब्ल्यू स्टील, अपोलो हॉस्पिटल्स, अदानी एंटरप्रायझेस, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आज NSE प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त तोट्याच्या यादीत दिसत आहेत. हे समभाग १.५६ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. दुसरीकडे बजाज ऑटो, अॅक्सिस बँक, आयशर मोटर्स, इन्फोसिस आणि इंडसइंड बँकेचे समभाग वधारले आहेत. मिड आणि स्मॉल कॅप समभाग नकारात्मक स्थितीत दिसले.