पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेनं सासरच्या व्यक्तींनी उपाशी ठेवून वारंवार शिवीगाळ आणि दमदाटी केल्याबाबत फिर्याद दिली आहे. १ सप्टेंबर २०१८ ते १७ ऑगस्ट २०२२ च्या दरम्यान उरण आणि हिंगणी (ता. खटाव) येथे पतीसह वास्तव्यास असताना आठ महिन्यांनंतर शरद हा दररोज दारु पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करत होता. पतीसोबत मुंबईला असताना दीर अमित याला दुकान टाकायचे म्हणून पतीने दिराला पैसे दिले. तेव्हा आपल्याला पण संसार आहे. त्यांना पैसे का देता अशी फिर्यादीने विचारणा केली असता फिर्यादीला तेथून पुढे वारंवार मारहाण करुन तिचा छळ सुरू केला.
फिर्यादी मुंबईवरून हिंगणी (ता.खटाव) सासरी आल्यास लग्नात आम्हाला काही दिले नाही म्हणून आम्हाला टॅम्पो घेण्यासाठी आता माहेरहून १० लाख रुपये घेऊन ये, असा तगादा सासरच्या मंडळींनी लावला. माहेरची परिस्थिती बिकट असताना नातेवाईकांनी सासरच्या लोकांना समजावून सांगितले होते. यावेळी फिर्यादीचे वडील संजय सूरसिंग परकाळे यांनी कुटुंबातील सदस्यांची बैठक घेवून समजूत घातली. परंतु सासरच्या लोकांच्यात काही फरक पडला नाही.
त्यानंतर संचारबंदीच्या कालावधीत सासरी असताना सासरे विलास काळे, सासू रंजना काळे हे फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करू लागले. तसंच दीर अमित काळे, त्याची पत्नी शितल काळे हे दोघे काही ना काही कारणावरुन भांडण काढून मारहाण करू लागले, असं फिर्यादीत म्हटलं आहे. याबाबत पोलीस नाईक रुपाली धीवार अधिक तपास करत आहेत.