ग्रेटर नोएडा: ग्रेटर नोएडातील उद्योजक आदित्य सोनी ५ जुलैपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह गंगा कालव्यात आढळून आला. सोनी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या मित्रांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनी यांची कार, काही दागिने आणि मोबाइल फोन जप्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी सोनी यांच्या हत्येची कबुली दिली आहे. एका जोकवरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे सोनी यांची हत्या केली.

येथील ओमनिक्रॉन १ सेक्टरचे रहिवासी सोनी हे ५ जुलै रोजी करोनाबाधित होते. ते बरे झाल्यानंतर घरी परतले. त्यानंतर ते एका नातेवाइकाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. तेव्हापासून ते बेपत्ता झाले होते. १३ जुलै रोजी आदित्य यांच्या आईने कसना पोलिसांशी संपर्क साधला. आपल्या मुलाला बेपत्ता होण्याच्या आधी त्याचे मित्र देव भाटी आणि पंकज भाटी यांच्यासोबत पाहिले होते, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पंकज आणि देव हे दोघे भाऊ आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आदित्य यांच्या आईने दिलेल्या माहितीच्या आधारे चौकशी सुरू केली. देव आणि पंकज यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर या हत्येच्या घटनेचा खुलासा झाला. आरोपी भाटी बंधूंकडून सोनी यांची कार, काही दागिने आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून सोनी यांचा मृतदेह गंगा कालव्यातून बाहेर काढून ताब्यात घेण्यात आला.

चौकशीदरम्यान पंकजने पोलिसांना हत्येची माहिती दिली. ५ जुलै रोजी जोकवरून आदित्यसोबत भांडण झाले होते. आदित्य सोनी त्याच्यावर संतापला होता. त्यानंतर त्याने देवला सोबत घेऊन काठीने मारहाण केली. त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी आदित्यचा मृतदेह गंगा कालव्यात फेकून दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे कालव्यात फेकलेल्या मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली. आरोपींविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here