औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड तालुक्यात असलेल्या वडजी या छोट्याशा गावात राहणारा एकेकाळचा कुविख्यात गुन्हेगार आता बागायतदार झाला आहे. हे सर्व घडलं आहे त्याच्या बायकोमुळे. वडजी या गावात राहणारे आयजी विक्रम चव्हाण हे बीड जिल्ह्याच्या अगदी जवळच असल्याने बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यासह ५० पेक्षा अधिक गावात कुविख्यात होते. आजूबाजूच्या कुठल्याही गावात चोरी झाली की आयजी चव्हाण यांच्यावरच संशय यायचा. त्यामुळे पोलिसांच्या भीतीने आयजी हे जंगलात लपायचे. रात्री अपरात्री घरी यायचे थोडा वेळ थांबयचे आणि पुन्हा जंगलात निघून जायचे. पती कुविख्यात असलेल्या त्यांच्या पत्नी नर्मदा यांना मोठा अपमान सहन करावा लागत असे. गावात त्यांच्याकडे नेहमी हीन दृष्टीने पाहिलं जात असतं. मात्र, यासर्वामुळे नर्मदा यांनी हार मानली नाही. तर, हिम्मत दाखवून पतीला आणि स्वत:ला सन्मानाने जगण्यायोग्य बनवलं.

कुविख्यात गुन्हेगाराला बायकोने बनवलं बागायतदार

चोरी, गुन्हेगारीने आजूबाजूच्या पन्नास गावात कुविख्यात, त्यातच दारूचे प्रचंड व्यसन, कुठेही चोरी झाली की यायचं आयजी चव्हाण यांचं नाव आणि पोलीस दारात धडकायचे. अनेकवेळा जेलमध्ये देखील जावे लागले. हे नित्याचेच झाले. यामुळे आयजी नेहमी जंगलातच राहत. या सर्व प्रकारामुळे आयजीच्या पत्नी नर्मदा चव्हाण यांना मुलांच्या भविष्याची चिंता सतवायची. एके दिवशी पती घरी येताच नर्मदा यांनी सर्व शेती स्वत:च्या नावावर करुन घेतली आणि स्वतः शेतीला सुरुवात करत कोरडवाहू शेताचं रुपडं पालटत फळबाग फुलवली. इतकंच नाही तर एकेकाळच्या गुन्हेगार पतीला आज बागयतदार बनविलं.

कुठल्याही गावात चोरी झाली की संशय आयजी चव्हाणांवर

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड तालुक्यात असलेल्या वडजी या छोट्याशा गावातील ही कहाणी आहे. वडजी या गावात राहणारे आयजी विक्रम चव्हाण हे बीड जिल्ह्याच्या अगदी जवळच असल्याने बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात कुविख्यात होते. आजूबाजूच्या कुठल्याही गावात चोरी झाली की आयजी चव्हाण यांचंच नाव यायचं. त्यामुळे पोलिसांच्या भीतीने आयजी हे जंगलात लपायचे. रात्री अपरात्री घरी यायचे थोडा वेळ थांबयचे आणि पुन्हा जंगलात निघून जायचे.

जमीन आपल्यानावे करुन घेतली

आयजी विक्रम चव्हाण यांच्या पत्नी नर्मदा या मुलांचा सांभाळ करुन घराचा गडा हाकात होत्या. रोज पोलिसांची विचारणा, गावात सतत होणारा अपमान गिळत त्यांनी अनेक वर्षे काढली. मात्र, मूलं मोठी होत होती. त्यांच्या भविष्याची चिंता नर्मदा यांना नेहमी सतावत होती. दरम्यान, पतीने दारुच्या नशेत वडिलोपर्जित असलेली काही जमीन विकून टाकली होती. यामुळे नर्मदा या चिंतेत होत्या. दरम्यान, एके दिवशी आयजी चव्हाण हे पोलिसांपासून लपत लपत घरी आले, तेव्हा नर्मदा यांनी उर्वरित जमीन आपल्या नावावर करून घेतली. त्यानंतर त्यांनी ती कसायला सुरुवात केली.

नवरा जंगलात फिरतोय, मुलांचा सांभाळ, नर्मदासमोर अनेक समस्या

कोरडवाहू शेतीत उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी शेतात विहीर करुन बागायती करण्याचा विचार केला. मात्र, जवळ दमडीही नव्हती नवरा जंगलात फिरतोय, मुलांचा सांभाळ करायचाय, अशा सर्व अडचणी होत्या. मात्र, या अडचणींना न घाबरता नर्मदा यांनी कोरडवाहू शेतीतून मिळत असलेलं उत्त्पन्न जमवले आणि त्यातून विहीर खणली. पती आयजी चव्हाण यांची समजूत काढली. हळूहळू काही वर्षे निघून गेली आणि आयजी चव्हाण सुधारले. आयजी देखील पत्नी नर्मदा यांच्यासोबत शेतीत रमले. दोघेही मनलावून शेती करत असल्याने शेतातील उत्त्पन्न वाढलं. आज आयजी चव्हाणकडे स्वतःची १५ एकर जमीन आहे.

भीती पाठ सोडेना म्हणून लावले सीसीटीव्ही

सर्व शेती बागायती असून दोन विहिरी आणि ९ बोअर शेतात आहे. पाण्याच्या मुबलकतेने आता चव्हाण दाम्पत्याने मोसबींची फळबाग लावली आहे. स्वतःची पंधरा एकर करुन चव्हाण दाम्पत्य सुमारे साठ एकर शेती बटाईने आणि ठेक्याने करत आहेत. त्यांनी स्वतःच ट्रॅक्टर घेतलं आहे. तर मळणीयंत्र देखील आहे. शेतीला जोड म्हणून कुक्कुट पालन देखील सुरु केले आहे. आयजी आणि नर्मदा यांना पाच मुलं, पाच मुली अशी दहा अपत्ये आहेत. सर्व कुटुंबसोबत राहतं. आजही पंचक्रोशीत कुठे चोरी, दरोडे, लुटमार झाल्यास पोलीस संशय घेतात. यामुळे आयजी चव्हान यांनी स्वतःच्या घराजवळ शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here