लक्ष्मी हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी नात्यातील तरुणासोबत झाला होता. मात्र, त्यानंतर लक्ष्मी हिने धानेशा याच्यासोबत पळून जाऊन प्रेम विवाह केला. या लग्नाला लक्ष्मी हिच्या घरच्यांनी विरोध केला होता. त्यानंतर लक्ष्मीच्या माहेरच्या नातेवाईकांनी लक्ष्मी सोबतचे असणारे सर्व संबंध तोडून टाकले होते. गेल्या चार वर्षांपासून लक्ष्मी पती धानेशा माडग्याळ याच्यासोबत सिंदूर गावापासून ३ किलोमीटर अंतरावर अढळहटी रोडवर असणाऱ्या कर्नाटक सीमेवर एका शेतात राहत होती.
दोघांनाही एक दोन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा होता तर लक्ष्मी ही सध्या तीन महिन्याची गर्भवती होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी लक्ष्मी आपल्या मुलांसोबत गायब असल्याचं निदर्शनास आल्यानंतर तिचा शोध घेतला असता शेतातल्या विहिरीमध्ये लक्ष्मी व त्याच्या दोन वर्षीय मुलीचे मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यानंतर घटनास्थळी जत पोलिसांनी धाव घेत आईसह दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
दरम्यान, पळून गेल्यानंतर धानेशा आणि लक्ष्मी यांच्यामध्ये असणारे प्रेम प्रकरण मिटवण्यासाठी लक्ष्मी हिच्या आई-वडिलांनी धानेशा याला पैसे दिले होते आणि या पैशावरून लक्ष्मी आणि धानेशा यांच्यामध्ये भांडण होत असत. यामधूनच लक्ष्मी हिने आपल्या दोन्ही मुलांसह विहिरीमध्ये उडी घेऊन ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत लक्ष्मीच्या माहेरच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी जत पोलीसांनी घटनेची नोंद करत या आत्महत्या आहे की घातपात ? या दृष्टीने तपास सुरू केला आहे.