जयपूर : काँग्रेसने राजस्थानमधील बंडखोर नेते यांची सर्व पदांवरुन हकालपट्टी केल्यानंतर वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेली भाजपा आता सक्रिय होण्याची शक्यता आहे. कारण, सचिन पायलट यांच्यासारखा नेता भाजपला मिळाला तर हा संपूर्ण राजस्थानमध्ये प्रभाव वाढवणारा प्रसंग असेल. सचिन पायलट यांनी राजस्थानमधील जातीय समीकरणाला एक नवं वळण दिलेलं आहे. गुज्जर आणि मीना समुदायातील पायलट यांचा प्रभाव हा भाजपसाठी लॉटरी ठरू शकतो.

सचिन पायलट यांनी बंडखोरी केली असली तरी अत्यंत महत्त्वाच्या दोन समुदायातील आमदारांचाही त्यांना पाठिंबा आहे. काँग्रेस आमदारांच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या बैठकीत मीना समुदायाच्या किमान पाच आमदारांचा समावेश आहे. गुज्जर नेता म्हणून ओळख असलेल्या सचिन पायलट यांच्यामागे मीना समुदायातील लोकप्रतिनिधी ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळेच भाजप आता गप्प बसणार नाही, असं जाणकार सांगतात.

दरम्यान, आपण भाजपात जाणार नाही, असं सचिन पायलट यांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं. पण एका दगडात दोन पक्षी मारता येत असतील तर भाजप नेतृत्त्वही शांत बसणार नाही हे राजस्थानमधील नेतेही ओळखतात. कॅबिनेट मंत्री रमेश मीना आणि हरिश मीना यांचाही बंडखोर आमदारांमध्ये समावेश आहे. सचिन पायलट यांना आपला नेता मानत या आमदारांनी थेट काँग्रेस हायकमांडविरोधातच बंड पुकारलं. काही वर्षांपूर्वी गुज्जर आणि मीना समाज आपला अनुसूचित जातीत समावेश करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता.

जातीय समीकरणं राखण्यात पायलट यांची बाजी
२०१४ ला दौसामधून लोकसभेत विजय मिळवल्यानंतर सचिन पायलट यांनी गुज्जर-मीना समुदायाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पूर्व् राजस्थानमध्ये यासाठी दोन्ही समुदायांच्याय नेत्यांसह अनेक रॅली झाल्या. दौसा, सवाई माधोपूर, भरतपूर, जयपूर ग्रामीण आणि कुराली या भागांमध्ये या दोन समुदायांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे. २०१८ मध्ये सचिन पायलट यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली. या भागात काँग्रेसने ४९ पैकी ४२ जागा जिंकत भाजपचा सुपडासाफ केला.

दौसा आणि भरतपूरमधून दोन वेळा खासदार राहिलेले दिवंगत नेते आणि सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांचीही या भागात मोठी पकड होती. सचिन पायलट यांनीही पुढे हेच सूत्र कायम ठेवलं. पण गुज्जर समुदायाने एसटीमध्ये नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण मागितल्यानंतर मीना समुदायाचा संताप अनावर झाला. यावरुनच दोन्ही समुदाय आमनेसामने आले. पण नुकतंच गुज्जर समुदायाने ओबीसीत समावेशाची मागणी केल्यानंतर मीना आणि गुज्जर समुदायाचं मनोमिलन झालं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here