व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग या दोन बलाढ्य देशांच्या हुकूमशहांना आपापल्या देशांच्या सीमा विस्तारण्याच्या वेडाने पछाडले आहे. पुतिन यांनी युक्रेनमध्ये प्रत्यक्ष सैन्य घुसवून साऱ्या जगाला मंदीच्या उंबरठ्यावर नेऊन उभे केले आहे. जिनपिंग हे अधिक धूर्त असल्यामुळे ते युक्रेनचा पुरता निकाल लागेपर्यंत तैवानला प्रत्यक्ष हात घालणार नाहीत. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात शी यांनी आपली पकड अधिक पक्की केल्याचे तूर्त तरी दिसते आहे. ‘एकात्म चीन’ ही शी यांची आवडती घोषणा आहे. त्यात तैवान जसा येतो; तसा चीनचा दावा असणारा भारतीय भूभागही येतो, हे विसरून चालणार नाही. या अधिवेशनाच्या आरंभी गलवान खोऱ्यात उडालेल्या चकमकीची फिल्म दाखविण्यात आली. करारानुसार येथे शस्त्रे वापरली जात नाहीत. मात्र, चिनी सैनिकांनी अणकुचीदार खिळे लावलेल्या काठ्यांनी हल्ला चढविला होता. भारताने नंतर त्याला प्रत्युत्तर दिले. मात्र, चीनने किती सैनिक मारले गेले, हे आजही जाहीर केलेले नाही. याच अधिवेशनात गलवान खोऱ्यात चिनी तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या सैन्याधिकाऱ्याला पाचारण करण्यात आले होते. ‘अत्यंत प्रतिकूल स्थितीत आपले सैनिक कसे शत्रूला तोंड देत आहेत,’ हे त्याने अपेक्षेप्रमाणे सांगितले. या साऱ्याचा अर्थ, चीन भारताला केवळ शत्रू मानतो इतकाच नाही. उद्या वेळ आली तर भारताशी पुन्हा सशस्त्र संघर्ष करून सीमाप्रश्न सोडविण्यास चीन मागेपुढे पाहणार नाही, हा तो इशारा आहे. शी यांना इतिहासात नाव कोरून ठेवायचे असल्याने तैवानचे चीनमध्ये कोणत्या ना कोणत्या सूत्राने विलिनीकरण त्यांना आवश्यक वाटते. म्हणूनच त्यांनी भाषणात ‘एक देश, अनेक राज्यपद्धती’ हे फसवे व चिनी नेत्यांच्या तोंडी न शोभणारे तत्त्व मांडले. हाँगकाँग आणि मकाव बेटे हे भूभाग तेथील राज्यपद्धत चालू ठेवूनही चीनमध्ये आहेत. मग तैवानही असा का राहू शकणार नाही, या प्रश्नाचा खरा अर्थ ‘आज ना उद्या आम्ही तैवान काबीज केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा आहे. हा एका अर्थाने भारतालाही इशारा आहे.

शी यांनी चीनच्या आर्थिक ताकदीच्या फुशारक्या मारल्या असल्या तरी या महत्त्वपूर्ण बैठकीत कोणतीही आर्थिक आकडेवारी ठेवण्यात आली नाही. तशी ती ठेवण्याची प्रथा आहे. दुसरीकडे, चीनमध्ये करोना पुन्हा झपाट्याने पसरत असून दहा लाखांच्या लोकवस्तीला घरात डांबून घालण्यात आले आहे. त्याचवेळी, शी हे ‘शून्य कोविड’ हे धोरण यशस्वी ठरल्याचे सांगत होते आणि आता चीनला केवळ विकासाचा वेग वाढवायचा नसून तंत्रज्ञानाच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हायचे आहे, हे सांगत होते. त्यांच्या या वक्तव्याचाही काही संबंध भारताशी आहे. जगातल्या अनेक कंपन्या ‘औद्योगिक उत्पादनाचे भावी आगार’ म्हणून भारताकडे पाहात आहेत. चीन व भारत यांच्यातील आर्थिक अंतर प्रचंड आहे. मात्र, एखाद्या देशाला विकासातील स्पर्धक मानणे आणि शत्रू समजणे, यात फरक आहे. चीन भारताला शत्रू मानतो, हे अलीकडे वारंवार दिसून येते आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. ही बैठक चालू असतानाच सीमेवर अरुणाचल प्रदेशातील काही भारतीय तरुण बेपत्ता व्हावेत आणि श्रीलंकेतील चिनी लष्करी तुकड्यांच्या वाढत्या वावराबद्दल तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे तक्रार करावी; या बाबी भविष्यातील संघर्षाचे सूचन करतात.

काही दिवसांपूर्वी शी संकटात सापडले असून चीनमध्ये बंड होण्याची शक्यता आहे, अशा अफवांनी जगात धुमाकूळ घातला होता. शी यांचे आक्रमक भाषण आणि त्यांचा एकूण वरचष्मा पाहता त्यांना अपेक्षित असलेली आमरण अध्यक्षपदाची घटनादुरुस्ती या अधिवेशनात झाल्यास नवल नाही. भारताच्या दृष्टीने चीनचे नेतृत्व शी करतात की इतर कोणी; हा प्रश्न नसून चीनचा भारताबद्दलचा दृष्टिकोन काय राहणार, हा आहे. नेता बदलला तरी धोरणे बदलत नाहीत. नाहीतर, १९६२ पासून सीमाप्रश्न तसाच राहिला नसता. सध्याही, सीमेवरील संघर्ष मिटावा, यासाठी भारत आणि चीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा चालू आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही अलीकडेच ही बोलणी चालू राहतील, असे स्पष्टपणे म्हटले आहे. चर्चेच्या या फेऱ्या चालू असताना चिनी राज्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिवेशनात गलवान संघर्षाची चित्रफीत दाखविणे, गलवानमध्ये जखमी झालेला सैन्याधिकारी की फबाव याला तेथे पेश करणे आणि त्याच्याकडून संघर्षाची तयारी वदवून घेणे ही दुटप्पीपणाची कमाल होती. पण भारताशी चीन कायम असाच वागत आला आहे. सुदैवाने, भारताची वाढती आर्थिक ताकद, नवी वैश्विक रचना व त्यातील भारताचे स्थान यामुळे भारताला कमी लेखून किंवा गृहित धरून चालणार नाही, हे चीनला कळते आहे. तूर्त करोनोत्तर जगाची नव्याने आखणी होत असताना भारताला अधिक वेगाने चौफेर प्रभाव वाढवावा लागणार आहे. तसा प्रभाव वाढणे, हेच चीनला खरे उत्तर असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here