वाचा:
महाराष्ट्राच्या राजकारणात एके काळी दबदबा असलेले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचे काँग्रेससोबत सख्य होते. गेल्या काही दिवसात मात्र दादा घराण्याने काँग्रेसशी फारकत घेतली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सांगली मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडला, तर विधानसभेतही उमेदवारी देण्यास टाळाटाळ झाल्याने दादा समर्थक पक्षावर नाराज होते. यातूनच वसंंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील या काँग्रेसला रामराम करण्याच्या विचारात आहेत. मंगळवारी पाटील यांच्या निवासस्थानी पाटील गटाच्या १२ नगरसेवकांसह समर्थकांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह काही कार्यकर्त्यांनी धरला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा कल राष्ट्रवादीकडे वाढल्याचे दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात सांगलीच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांची त्यांनी भेट घेतली होती. मात्र, अजूनही त्यांनी आपली भूमिका अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
वाचा:
सांगली महापालिकेत काँग्रेसचे २० नगरसेवक आहेत. यापैकी पाटील गटाचे १२ नगरसेवक आहेत. माजी मंत्री पतंगराव कदम आणि मदन पाटील यांच्या निधनानंतर राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी राजकारणापासून फारकत घेतली आहे, तर शहरात कदम गटाचा फारसा प्रभाव नसल्याने बहुतांश नगरसेवक जयश्री पाटील यांच्यासोबत आहेत. त्यांच्या निर्णयामुळे सांगलीतील काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
वाचा:
गेल्या आठवड्यात पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर माघारीचे नाट्य रंगले. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील पक्षाचे नगरसेवक फोडल्याचा आरोप झाला. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याच चर्चा झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांची घरवापसी झाली. आता सांगलीतही जयश्री पाटील यांची राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीची विस्तारवादी भूमिका काँग्रेसच्या निशाण्यावर येऊ शकते. यातून आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू होण्याची शक्याता नाकारता येत नाही.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times