मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संवेदनशीलता दाखवत आम्ही हा निर्णय घेतल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनी सांगितलं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सामना या मुखपत्रातून भाजपच्या हेतूविषयी शंका उपस्थित करत जोरदार टीका केली होती. शिवसेनेच्या या टीकेला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘भाजपने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या ३९७ जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर एक आहोत, हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिले. खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो. नाही तर पेंग्विन सेना. घरात बसून गणपत वाण्यासारखी नुसतीच स्वप्न बघणार,’ असा पलटवार आशिष शेलार यांनी केला आहे. ‘सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला गणपत वाणी आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही ना, याची खात्री करुन पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले. अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ,’ असा टोलाही शेलार यांनी आपल्या ट्वीटमधून लगावला आहे.

Andheri east by-election: राजसाहेब ठाकरेंनी अंधेरीची पोटनिवडणूक एकहाती जिंकली; मनसे नेत्याचं ट्विट चर्चेत

दरम्यान, आशिष शेलार यांनी पेंग्विन सेना म्हणून हिणवल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून पुन्हा काही प्रत्युत्तर दिलं जातं का, हे पाहावं लागेल.

भाजपवर टीकेचा आसूड ओढताना ‘सामना’त काय म्हटलं आहे?

दिवंगत आमदाराची पत्नी या निवडणुकीला उभी असल्याने आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपत उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत, असा दावा भाजपकडून करण्यात आला. मात्र भाजपच्या या दाव्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून जोरदार समाचार घेण्यात आला आहे.

‘अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मशालीचा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पाहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे,’ असा इशारा सामनातून राजकीय विरोधकांना देण्यात आला आहे. तसंच ‘शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील. पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल,’ अशी भविष्यवाणीही ‘सामना’तून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here