औरंगाबाद: धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरु असलेल्या युवक महोत्सवात एक नाटक बंद पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वाद निर्माण झाला असून यावरुन वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. युवक महोत्सवात नाटकांचे सादरीकरण सुरु असताना हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत रंगमंचावर सीता आणि लक्ष्मणात संवाद सुरु असताना दिसत आहे. सीताहरणाच्या प्रसंगात लक्ष्मण रेषा आखून रामाच्या शोधासाठी निघून जातो, असे या प्रसंगात दिसत आहे. त्यानंतर सीतेच्या व्यक्तिरेखेतील मुलगी लावणीवर नाच करताना दिसत आहे. ही बाब उपस्थित प्रेक्षकांमधील अनेकांना खटकली. त्यामुळे या सगळ्यांना जागेवर उभे राहत या नाटकाचा प्रयोग तात्काळ थांबवला. प्रेक्षकांचे आक्रमक रुप पाहून स्टेजवरील कलाकारांनीही तातडीने एक्झिट घेतली. मात्र, यानंतरही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हिंदू देवी-देवतांच्या भूमिका चुकीच्या पद्धतीने साकारल्याने ‘अभाविप’चे कार्यकर्ते संतापले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासन या सगळ्या प्रकारानंतर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आदिपुरुष सिनेमावर बंदी घाला, अयोध्येतील राम मंदिराच्या पुजाऱ्यांनी केली मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. १९ ऑक्टोबरपर्यंत हा महोत्सव चालेल. ३६ कला प्रकारात हा महोत्सव रंगणार आहे. यामध्ये मराठवाडा विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये असलेले १३६ महाविद्यालयातील १६५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिली होती. मात्र, आता या घटनेनंतर युवक महोत्सवावर वादाचे सावट निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here