जिल्ह्यात विरोधी पक्षाच्या काही आमदारांकडून सरकारी निधीतून होणाऱ्या कामासंबंधीचे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने आणि त्यातून राजकीय श्रेयवाद रंगल्यानंतर पालकमंत्र्यांकडून ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यासंबंधी सर्व विभागांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम समारंभ असेल त्या वेळी पालकमंत्र्यांनाही सदर कार्यक्रमास आमंत्रित केले जावे. त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्र्यांचे नाव योग्य प्रकारे छापण्यात यावे. समारंभांच्यावेळी पालकमंत्र्यांना आदराचे स्थान देऊन त्यांची व्यासपीठावरील बैठक व्यवस्था राजशिष्टाचाराप्रमाणे करण्यात यावी.
जिल्ह्यातील सर्व केंद्रीय मंत्री, अहमदनगर जिल्हयातील सर्व मंत्री यांनाही योग्य ती पूर्वसूचना देऊन आमंत्रित करण्यात यावे. त्यांना विश्वासात घेऊन ते कार्यक्रमास उपस्थित राहणार किंवा कसे याची खातरजमा करुन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव योग्य प्रकारे छापण्यात यावे, असे पत्रात म्हटलं आहे. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नगर जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम अथवा समारंभ असेल त्या कार्यक्रमास शासकीय निधीतून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन, उद्घाटन यांचे आयोजन करण्यापूर्वी पालकमंत्रीची पूर्व परवानगी घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्यामुळे आपल्या विभागातील कोणताही शासकीय कार्यक्रम घेण्यापूर्वी पालकमंत्री कार्यालयाकडून पूर्वपरवानगी घेण्यात यावी, त्यानंतरच कार्यक्रमाचे नियोजन करावे. अन्य कोणत्याही पदाधिकारी यांनी पूर्वपरवानगीशिवाय कार्यक्रमाचे आयोजन केल्यास योग्य ती कारवाई करावी, असे या पत्रात म्हटले आहे. जुन्या आणि नवीन सरकारच्या काळात झालेल्या कामांचे श्रेय घेण्यासंबंधी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये स्पर्धा सुरु असल्याचे दिसून येते. त्यामुळेच सत्ताधारी लोकप्रतिनिधींसोबतच विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडूनही कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याचे दिसून येते. कर्जत-जामखेड, पारनेर आणि संगमनेर या भागात विशेष करुन अशी स्पर्धा आहे. या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या या आदेशाकडे पाहिले जात आहे. यातून अधिकाऱ्यांचीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस ; पावसाचा लोंढा थेट दगडूशेठ मंदिरात